मध्य रेल्वे आणि सिडको प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील रेल्वेस्थानके सिडकोच्या ताब्यात असून त्याचा वापर मध्य रेल्वेकडून केला जात आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांच्या देखभाल-दुरूस्तीकडे दोन्ही प्राधिकरणांकडून टाळाटाळ केली जाते. यामध्ये रेल्वे प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अखेर सोमवारी सिडकोच्या ताब्यातील तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित रेल्वेस्थानकांचेही मध्य रेल्वेकडे लवकरच हस्तांतरण होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावं लागत
सिडकोच्या ताब्यात असलेल्या वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे २००३ आणि २००८ मध्ये संपले होते. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नव्हता. तर ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नव्हता. यामुळे आवश्यक सोयी-सुविधांअभावी प्रवाशांचे हाल होत होते. मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन या दोन्ही प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत होते.
अखेर यासंदर्भात खासदार म्हस्के यांनी १५ मे २०२६ रोजी रेल्वे मुख्यालयात बैठक घेऊन यासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले होते. पुढील महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्ये रेल्वेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी तीन स्थानकांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. सिडको भवन (बेलापूर) येथे आयोजित बैठकीत सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वेस्थानके हस्तांतरण प्रक्रियेप्रसंगी मध्य रेल्वेच्या वतीने अभिषेक कुमार गुप्ता, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सिडकोचेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तक्रारींची दखल
नवी मुंबई परिसरातील रेल्वेस्थानकांच्या दुरवस्थेबाबत आणि तेथील अपुऱ्या प्रवासी सुविधांबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांकडे सातत्याने तक्रारी केल्या जातात. या समस्यांची दखल घेऊन म्हस्के यांनी ‘रेल्वे सल्लागार समिती’ चे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथील होणाऱ्या बैठकांमध्ये हा विषय वारंवार मांडला होता. स्थानकांची झालेली पडझड, देखभालीचा अभाव आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे सामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. अखेर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते.
सुविधा उपलब्ध होतील
तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. उर्वरित स्थानकांबाबतही प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल. काही अतिरिक्त जागा, खुल्या जागा आणि त्यांच्या देखभालीसंदर्भातील विषयांवर सिडको आणि रेल्वे यांच्यात चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नव्हत्या. मात्र आता स्थानके रेल्वेच्या ताब्यात गेल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगल्या, दर्जेदार आणि सुसज्ज सुविधा मिळतील, असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
