पुणे शहर म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, पण या शिक्षणाच्या पंढरीत आता गुन्हेगारी फोफावतेय. रोज काही ना काही घटना या शहरात घडत आहेत. अत्याचार, हत्या, दरोडा अशा अनेक प्रकारच्या घटनांची जणू मालिकाच या पुण्यात सुरु आहे. याचदरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या ऑफिसवर गोळीबार झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. गुरुवारी 18 जून रोजी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विशेष म्हणजे, या गोळीबारानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘…त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला’
मिळालेल्या माहितीनुसार, मंतरवाडी परिसरात असलेल्या एच.विकास स्टील या कंपनीच्या ऑफिसला लक्ष्य करत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऑफिसच्या परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या पोस्टमध्ये, ‘आम्ही अनेकवेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला,’ असा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना पुढील काळात गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, अशा स्वरूपाच्या धमक्याही पोस्टमध्ये देण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून अधिकृत दुजोरा नाही
या पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि टायसन बिश्नोई या नावांचा उल्लेख असून त्यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या पोस्टची सत्यता आणि त्यामागे खरोखरच लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का? याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलं असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हा प्रकार खंडणी, व्यावसायिक वाद किंवा इतर कोणत्या कारणातून घडला याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुण्यातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
