उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, ‘ऑपरेशन टायगर सक्सेसफूल झालं आहे’ अशी घोषणा सोमवारी सायंकाळी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये केली. या वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 पैकी सहा खासदारांनी जाहीररित्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामुळे शिंदेंच्या खासदारांचे संख्याबळ वाढलं असून आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 13 खासदार झाले आहेत. शिंदेकडे आधी सात खासदार होते. त्याला आता सहा खासदारांचं अधिक बळ मिळालं आहे. मात्र ऑपरेशन टायगरच्या यशामुळे आता पक्षाचा केंद्रातील सत्तेतही वाटा वाढणार आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं केंद्रातील वजन अधिक वाढणार असून नेमकं काय घडू शकतं पाहूयात…
आणखी दोन मंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला येणार?
सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे केंद्रात राज्यमंत्रीपदी आहेत. या मंत्रिपदाबरोबरच आता 13 खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला एक केंद्रीय मंत्रीपद आणि केंद्रीय राज्यमंत्री अशी दोन मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंकडे एकूण तीन मंत्रीपदे असतील अशी दाट शक्यता असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा खासदार थेट मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार?
विशेष म्हणजे हे ऑपरेशन टायगर राबवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील नेते आणि खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. श्रीकांत शिंदेंना पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळू शकतं. श्रीकांत शिंदे हे मागील वर्षभरापासून सहा खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासंदर्भातील ऑपरेशन टायगरवर काम करत होते. हे सहा खासदार आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांमध्ये ते दुवा म्हणून काम करत होते अशी माहिती समोर येत आहे. आता याच कामगिरीचं बक्षीस म्हणून त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळू शकतं. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या सहा खासदारांपैकी एकाला केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
याआधीही झालेली या खासदाराला मंत्री करण्याची मागणी
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हाच श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करण्याची मागणी शिवसेनेच्या काही नेत्यांकडून केली जात होती. मात्र त्यावेळेस श्रीकांत शिंदेंनी पक्ष संघटनेत काम करण्यास प्रधान्य दिलं. आता विधान परिषदेमधील यश आणि त्यानंतर ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदे केंद्रीतील मंत्रिपदाला होकार देतील असंही सांगितलं जात आहे.
शिंदेंचा पक्ष दुसऱ्या स्थानी
शिंदेंच्या शिवसेनेचे 13 खासदार असून त्यांनी नितीश कुमार यांच्या राष्ट्रीय जनता दल युनायटेडला (जेडीयू) खासदारसंख्येत मागे टाकलं आहे. जेडीयूचे एकूण 12 खासदार आहेत. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) 16 खासदार आहेत. टीडीपी ही खासदार संख्येनुसार भाजपाची सर्वात मोठी समर्थक पार्टी आहे. टीडीपी खालोखाल आता शिंदेंची शिवसेनेनं दुसऱ्या क्रमांकाचा भाजपाचा सर्वात मोठा मित्रपक्ष होण्याचा मान मिळवला असून जेडीयू तिसऱ्या स्थानी सरकली आहे.
