राज्यातील शेतकरी जून महिन्यात पेरणी करायला सुरूवात करतो. महाराष्ट्रातील खरीप हंगामासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण यंदा जून महिन्यात पाऊसचं झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पेरणी नेमकी करायची कधी याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. त्यात भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ‘एल निनो’च्या अंदाजामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. अशामध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंता
राज्यात 21 जूननंतर मान्सूनचा वेग वाढणार असा अंदाज पंजाबरावांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केला होता. त्यांनुसार कोकणात रेंगाळलेला मान्सून हळूहळू पुढे सरकू लागला होता. आता मान्सून पुणे जिल्ह्यात दाखल झाला असून येत्या 48 तासांमध्ये मुंबईसह संपूर्ण राज्यात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पण शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे पंजाबरावांच्या नव्या अंदाजाकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.
23 जून 2026 रोजी पंजाबराव डख यांनी ताजा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 23 जून ते 30 जून ठिकठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या लागणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जूनमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण जुलैमध्ये जूनपैक्षा पाऊस जास्त होणार आहे.
महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस होणार?
हा अंदाज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यासह मुंबई, पुणे नाशिकमध्ये 22 जूनला पाऊस सुरू झाला. मंगळवारी, 23 जूनपासून हा पाऊस वाढत जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसचं 5 जुलै पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असाहा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
