कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी टोकेखार-तुरुंबाडी सागरी पुलाचे काम वेगाने सुरू असून प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. आगरदांडा खाडीवरील या पुलाच्या खाडीतील खांबांचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्ही लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी पाहिलेले कोकणातील सागरी महामार्गाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे. सुमारे ४.३ किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि म्हसळा हे दोन महत्त्वाचे तालुके थेट जोडले जाणार आहेत. समुद्रात उभे राहिलेले खांब आणि सुरू असलेले ‘कॅपिंग बीम’चे काम पाहता हा प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
८०९ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
सुमारे ८०९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे बांधकाम एचसीसी इंडिया कंपनीमार्फत करण्यात येत आहे. जानेवारी २०२६ पासून कामाला विशेष गती मिळाल्याने आता पुलाचा आकार स्पष्टपणे दिसू लागला आहे. समुद्रातील अनेक खांब पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे. पुलासोबत दोन्ही बाजूंना अॅप्रोच रस्त्यांची कामेही वेगाने सुरू आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री, अभियंते आणि तांत्रिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
सध्या मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन आणि दिघी परिसरात प्रवासासाठी खाडीभोवती मोठा वळसा घालावा लागतो किंवा फेरीबोट सेवेवर अवलंबून राहावे लागते. मात्र हा पूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्ही लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही दिलासा मिळणार आहे. या पुलामुळे दिघी बंदरापर्यंतची मालवाहतूक जलद आणि कार्यक्षम होणार आहे. परिणामी औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
