मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी, कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?

चैत्र आणि वैशाख महिन्यात हमखास बरसणाऱ्या वळवाच्या सरी यावर्षी आल्या नाहीत. त्यात मृगनक्षत्राने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे जलाशयांची माया अटली आहे. रानावनात हिरवळ निर्माण झालेली नाही. सर्वत्र वैराण वाळवंटाप्रमाणे रखरखीत उन्हाळा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही कायम राहिला आहे. मानवी वस्तीला पिण्याच्या पाण्यासह पशुधनाला आवश्यक असणारे चारा पाणी आता दुरापास्त होत आहे. यापुढील चार दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर भीषण दुष्काळाची चाहुल लागली, असे म्हणावे लागेल अशी स्थिती आहे.

डोंगराकडे दुष्काळाची भयाण चाहुल

शाळा-महाविद्यालयांना आता सुरुवात झाली आहे. दरवर्षी आतापर्यंत नदी नाले प्रवाहीत झालेले असतात आणि हिरवाईने नटलेल्या डोंगरकड्यांचा आनंद घेण्यासाठी तरुणाईची पाऊले पहिणे बारी, दुगारवाडी या निसर्गस्थळांकडे वळतात. यावर्षी पहिणे बारीतील नदी प्रवाहात दगड गोटे दिसत आहेत, तर रखरखीत डोंगराकडे दुष्काळाची भयाण चाहुल दाखवत आहेत. त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळा विकासकामे होत आहेत. तलावांच्या सुशोभीकरणासाठी ते कोरडेठाक केले आहेत. पाऊस लांबल्यास जनावरांना पिण्यासाठी थेंबभर पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती विकासकामांसाठी निर्माण करण्यात आली आहे. भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन शासन यंत्रणा पाणी जपून वापरण्याचा सल्ला देत आहे. मात्र, विकासकामांसाठी पाण्याचा वारेमाप वापर होत आहे.

 

जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र सात जूनलाच सुरू झाले. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका आणि बाजरी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटीच मशागती करून शेती पेरणीसाठी तयार ठेवली आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करून लाखो रुपयांची गुंतवणूकही केली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पेरणीला मुहूर्तच मिळत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यातील टेहरे येथील शेतकरी गुलाब शेवाळे सांगतात, “एकरला आठ ते दहा हजार रुपये खर्च करून मका बियाणे घेतले. आता पाऊस नाही म्हणून ते घरातच पडून आहे. उशीर झाला तर उगवण क्षमता कमी होते. केवळ पेरणीचाच नाही, तर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *