ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबलडेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी करण्यात आले होते. मात्र तब्बल दीड महिना ही बस घोडबंदर रोड येथे आनंदनगर आगारात धूळखात पडली होती. अखेर ही डबलडेकर वातानुकूलित बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या पर्यावरणपूरक प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
चार्जिंगची पर्यायी व्यवस्था
डबलडेकर बसच्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सेवेत दाखल होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दोन आठवड्यांपूर्वी ठाणे परिवहन सेवेच्या वागळे आगाराला भेट दिली. यावेळी येथील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्यासाठी तसेच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबत चर्चाही केली होती. अखेर महापौरांच्या निर्देशांनंतर परिवहन प्रशासनाने चार्जिंगची पर्यायी व्यवस्था उभी केली. त्यामुळे अखेर १५ जूनपासून ही बस नियमित सेवेत दाखल झाली.
