3 जून 2006 रोजी झालेल्या पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी या दुहेरी हत्याकांड प्रकरणाची अंतिम सुनावणी आज 20 जून रोजी होत आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल लागत असल्यानं धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज सुरुवातीला कोर्ट आरोपींच्या दोषसिद्धीबाबत निर्णय देऊन ते दोषी आहेत की निर्दोष हे जाहीर करू शकते. आरोपी दोषी आढळल्यास शिक्षेच्या प्रमाणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्ट आपला अंतिम निर्णय जाहीर करेल.
कोण किती काळ तुरुंगात राहिलेलं?
या खटल्याच्या दीर्घ प्रवासात मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांचा सर्वात कमी काळ, म्हणजेच 3 महिने 19 दिवस पोलीस व न्यायालयीन कोठडीत मुक्काम होता. 6 जून 2009 रोजी अटक झाल्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यांत, 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने त्यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गुन्ह्यातील शूटर दिनेश तिवारी हा सर्वाधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिला. 25 मे 2009 रोजी अटक झाल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत न्यायाधीश महाले यांच्या कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला होता. तिवारीने तब्बल 15 वर्ष 11 महिने तुरुंगात काढले, तर दुसरा शूटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा 15 वर्ष 10 महिने तुरुंगात होता. सुनावणी दीर्घकाळ चालल्यामुळे हे दोन्ही शूटर एप्रिल 2025 मध्ये जामिनावर सुटले, तर माफीचा साक्षीदार बनलेला पारसमल जैन 14 वर्ष 6 महिन्यांनंतर बाहेर आला.
