गोरेवाड्यात ‘बिबट वॉर’! दोन नर, एका मादीने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयातील धक्कादायक घटना

गोरेवाडा जंगलातून आलेल्या बिबट्याने बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील तीन बिबट्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर वनविभागाने सलग शोधमोहीम राबवून या बिबट्याला सोमवारी पहाटे जेरबंद केले. या घटनेने वन विभागाच्या वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे कुंपण ओलांडून रविवारी दुपारी नर बिबट्या आत शिरला. बिबट सफारी परिसरातील पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या बिबट्यांशी त्याचा संघर्ष झाला. या संघर्षामध्ये बाहेरील बिबट्याने प्राणिसंग्रहालयाच्या एन्क्लोजरमधील तीन बिबट्यांना ठार केले. ठार झालेल्या बिबट्यांमध्ये सफारीमधील दोन नर आणि एका मादीचा समावेश आहे. हा संघर्ष झाल्याचे लक्षात येताच वनविभागाने शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या तीन बिबट्यांचे मृतदेह एकेक करून सापडत गेले.

गोरेवाडा जंगलातील बिबट प्राणिसंग्रहालयात शिरल्याच्या घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत. मात्र, बाहेरील आणि आतील बिबट्यांच्या संघर्षात तीन बिबट्यांनी जीव गमावल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. तिन्ही मृत बिबट्यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

डार्ट मारला, लावले पिंजरे
तीन बिबट्यांना मारणाऱ्या बाहेरच्या बिबट्याला पकडण्यासाठी गोरेवाडा प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रविवारी दुपारपासून प्रयत्न सुरू केले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. डार्ट लागल्यानंतर बिबट एका झुडपात जाऊन लपला. सुमारे अर्धा तासानंतर औषधाचा प्रभाव कमी झाल्यावर तो पुन्हा बाहेर आला. सायंकाळ ते सोमवारी पहाटेपर्यंत वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. या परिसरात बिबट्यासाठी पिंजरे लावण्यात आले. त्यानंतर, त्याला पिंजऱ्यांच्या दिशेने ढकलत ढकलत नेण्यात आले आणि पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अखेर त्याला जेरबंद करण्यात आले. या बिबट्याला पकडल्याने इतर प्राण्यांवरील हल्ले रोखण्यात यश आल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलर फेन्सिंगचे भिजत घोंगडे
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाभोवती जंगल असून तेथे वन्य श्वापदे आहेत. आतील प्राणी बाहेर जाऊ नयेत म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बाहेरील प्राण्यांनी आत जाऊ नये म्हणून येथे पुरेसे सुरक्षित कुंपण घालण्यात आलेले नाही. प्राणिसंग्रहालयाभोवती सौर कुंपण घालण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता. प्राणिसंग्रहालय प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या स्तरावर अडगळीत पडून आहे. त्यामुळे, आजवर प्राणिसंग्रहालयाभोवती सौर कुंपण घातले गेले नाही. प्राणिसंग्रहालयात झालेल्या या घटनेनंतर सौर कुंपणाकडे झालेल्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *