मुंबईतील पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधेच्या संशयास्पद घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता भिवंडीत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला १४ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा आकडा तब्बल ३७ वर पोहोचला असून रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील एका शोरमा सेंटरमधून शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि मळमळ यांसारखा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
रुग्णसंख्या १४ वरून थेट ३७ वर
उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ११ रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर रात्रीभर आणि शुक्रवारी सकाळीही नवीन रुग्ण उपचारासाठी येत राहिले. सध्या रुग्णालयात ३७ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील दोन रुग्ण बालक आहेत. काही रुग्णांची प्रकृती सुधारत असली तरी नव्याने रुग्ण दाखल होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
