‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून एका तरुणाला बेसबॉल स्टिकने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी तीन आरोपींना नवी मुंबईतून अटक करण्यात आली असून, हल्लेखोर मृत तरुणाचे जवळचे मित्र असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हर्ष मच्छिंद्र जाधव (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हर्ष आणि आरोपी मित्र आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून एका तरुणीसोबतच्या प्रेमसंबंधांवरून वाद सुरू होता. त्यातून दोन दिवसांपूर्वी हर्षने मद्यधुंद अवस्थेत आरोपींपैकी एका मित्राच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता. त्याचा सूड घेण्यासाठी आरोपींनी हर्षचा खून करण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गंभीर जखमी हर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चतुःशृंगी पोलिस तपास करीत आहेत.
घरगुती कारणावरून पत्नीचा खून
घरगुती कारणांवरून शारीरिक व मानसिक त्रास देऊन ओढणीने गळा बांधून पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे-सातारा महामार्गावरील कोंढणपूर फाट्याजवळ आर्वी गावच्या हद्दीत गुरुवारी पहाटे घडली. ऋतुजा अक्षय तावरे (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय रामदास तावरे ( वय २८) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अनिकेत दादासाहेब पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा अक्षयचा मेहुणा आहे. अक्षय व पत्नीमध्ये वारंवार घरगुती कारणावरून वाद व्हायचे. राग येऊन अक्षयने पत्नीचा खून केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. राजगड पोलिस तपास करीत आहेत.
