तिसऱ्या मुंबईचा विकास होणार, नवी मुंबई विमानतळाजवळ उभारणार नवं शहर; पण प्रकल्पासमोर ३ मोठी आव्हानं

मुंबईतली गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने ५० वर्षांपूर्वी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आता तिसरी मुंबईची निर्मिती करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असणाऱ्या परिसरात तिसरी मुंबई उभारण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगर प्रदेशातला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प असणार आहे. तिसरी मुंबई ही केएससी (कर्नाळा-साई-चिरनेर) न्यू टाऊन या नावाने ओळखली जाईल. पनवेल, पेण आणि उरण तालुक्यातल्या १२४ गावांमध्ये ३२३ चौ. कि. मी. हून अधिक क्षेत्रात हे नवीन शहर वसवलं जाणार आहे.

एमएमआरमधल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी तिसरी मुंबई ही एक खूप मोठी संधी असणार आहे. तिसऱ्या मुंबईतल्या स्थावर मालमत्ता विकासाचा पाया हा प्रामुख्याने कनेक्टिव्हिटीवर आधारित असेल. त्यात सध्या तरी प्रामुख्याने तीन प्रकल्पांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.

कोणती कामं सुरू ?

अटल सेतू (एमटीएचएल) या सागरी पुलामुळे दक्षिण मुंबई ते चिर्लेदरम्यानचं अंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये कापता येतं. त्यामुळे मुंबईतला उच्चभ्रू आणि व्यावसायिक वर्ग नवी मुंबईकडे आकर्षित होत आहे. अटल सेतूचा फायदा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईलासुद्धा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झालं असून विमानतळाला लागून असणाऱ्या परिसरातच तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. या भागात हॉटेल्स, व्यावसायिक कार्यालयं आणि आलिशान गृहप्रकल्पाची काम आधीच सुरू झाली आहेत.

विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर हा मार्ग तिसऱ्या मुंबईला उर्वरित एमएमआर क्षेत्राशी जोडेल. त्यामुळे लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग क्षेत्राला चालना मिळत आहे. या मार्गाचं काम वेगाने सुरू असून नजीकच्या भविष्यात तो वाहतुकीसाठी खुला होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *