पुण्यातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने (एसीपी) आपल्याच सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत तिच्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदांकडूनही विवाहितेला मारहाण आणि छळ करण्यात आला असून, कोंढवा पोलिसांनी निवृत्त एसीपीसह कुटुंबातील तब्बल ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या धक्कादायक प्रकरणी एका ३० वर्षीय विवाहितेने कोंढवा पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निवृत्त एसीपी सुरेश रामचंद्र घाडगे, पती विक्रांत घाडगे, सासू सुनंदा घाडगे, नणंदा स्नेहल सर्जेराव व वैशाली राऊत, आणि जावई प्रवीण सर्जेराव व विक्रम राऊत अशा सात जणांविरोधात छळवणूक आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या वडिलांच्या एका मित्रामार्फत विक्रांत घाडगे याचे स्थळ आले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये विमाननगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत थाटामाटात या दोघांचा साखरपुडा पार पडला, तर एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे विवाह झाला. साखरपुडा आणि लग्नाचा संपूर्ण खर्च, तसेच मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने पीडितेच्या आई-वडिलांनी हौसेने दिले होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. सासूने सुनेचे सर्व दागिने स्वतःच्या ताब्यात घेतले. पती विक्रांत हा विवाहितेला वारंवार घरात कोंडून ठेवायचा. तिला नोकरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली, इतकेच नव्हे तर तिचे सोशल मीडिया अकाऊंट्स देखील बळजबरीने बंद करायला लावले. पीडितेचे आई-वडील जेव्हा मुलीला भेटायला घरी यायचे, तेव्हा सासरच्यांकडून त्यांचाही अपमान केला जात होता.
पीडितेने फिर्यादीत सासऱ्याने दिलेल्या धमकीचाही उल्लेख केला आहे. “मी एसीपी होतो, गुन्ह्याचे पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे माझ्याविरुद्ध काही करायचा प्रयत्न करू नको,” असे सांगून सासरा तिच्यावर प्रचंड दडपण आणायचा. विवाहितेने सासरच्या जाचाला विरोध केला असता, “माझ्याकडे अजूनही बंदूक आहे, तुला इथेच मारून गाडून टाकेन!” अशी थेट जीवे मारण्याची धमकी निवृत्त एसीपी सुरेश घाडगे द्यायचा.
या संपूर्ण छळात पती, सासू आणि नणंदांकडून विवाहितेला सतत शिवीगाळ व अमानुष मारहाण केली जात होती. त्यातच सासऱ्याने तिच्याकडे प्रत्यक्ष शारीरिक सुखाची मागणी केल्याचा अत्यंत गंभीर आरोप पीडितेने केला आहे. या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने पोलिसांचे दार ठोठावले असून, कोंढवा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
