कर्जत-रोहा रेल्वेमार्गाची नवी जोडणी; मालवाहतुकीच्या प्रवासवेळेत बचत होणार, प्रकल्पाची वैशिष्ट्ये अन् फायदे काय?

राज्यातील रेल्वे जाळे वाढवण्यासह जेएनपीटीतील मालवाहतुकीला अधिक गती देण्यासाठी आता नवा मार्ग तयार होणार आहे. मध्य रेल्वेवरील सोमाटणे-चिखली ‘कॉर्ड लाइन’ प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कर्जत मार्गावरील चिखली आणि रोहा मार्गावरील सोमाटणे स्थानकांदरम्यान हा रेल्वेमार्ग असेल. यामुळे पनवेल स्थानकावरील गर्दी विभागली जाणार आहे. मालवाहतुकीच्या वेळेत सुमारे दोन तासांची बचत होणार आहे.

१७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित

सध्या कर्जत आणि रोहा मार्गांदरम्यान थेट रेल्वेमार्ग उपलब्ध नाही. कर्जतवरून रोह्याला जाण्यासाठी पनवेलमार्गे जावे लागते. पनवेल टर्मिनसमधून उपनगरी रेल्वेसह मेल-एक्स्प्रेस, मेमू आणि मालवाहतूक गाड्यांची हाताळणी होते. यामुळे मध्य रेल्वेवरील व्यग्र टर्मिनसमध्ये पनवेलचा समावेश होतो. नव्या रेल्वेमार्गामुळे कर्जत ते रोहा अशी थेट रेल्वे उपलब्ध होणार आहे. हा मार्ग ३.७ किमीचा असणार आहे. यासाठी १७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जोड मार्गामुळे कर्जत आणि रोहा मार्गांवरील गाड्यांना पनवेलमध्ये प्रवेश न करताही प्रवास पूर्ण करता येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘कॉर्ड लाइन’

देशातील सुमारे ६० टक्के कंटेनर वाहतूक जेएनपीटीमधून हाताळण्यात येते. मालगाड्यांना पनवेल जंक्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर इंजिनाची दिशा बदलण्यासाठी (रिव्हर्सल) थांबावे लागते. नवीन ‘कॉर्ड लाइन’ सुरू झाल्यानंतर मालगाड्यांना थेट मार्ग उपलब्ध होणार असून पनवेलला वळसा घालण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी प्रत्येक मालगाडीच्या वाहतुकीत सुमारे ११० मिनिटांची बचत होईल. परिणामी मालगाड्यांच्या फेऱ्या वाढतील, पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होईल आणि बंदराशी जोडलेली मालवाहतूक अधिक वेगवान होईल. यामुळे नव्या रेल्वे जोडमार्गाचा सर्वाधिक फायदा जेएनपीटीशी संबंधित मालवाहतुकीला होणार आहे. देशातील वाढत्या मालवाहतुकीच्या गरजा लक्षात घेता, रेल्वेक्षमता वाढवण्यासह मल्टिमोडेल कनेक्टिव्हिटी आणि कार्यक्षम मालवाहतूक पायाभूत सुविधा उभारणीवर रेल्वे प्रशासनाकडून भर देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *