नाशिकमध्ये सुटकेसमधील महिलेच्या बॉडीचा उलगडा, 28 सीसीटीव्ही फुटेजची मदत; हातावरील टॅटूमुळे मोठी माहिती समोर

तपोवन परिसरातील केवडीबन येथे एका सुटकेसमध्ये गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून संबंधित महिलेची हत्या झाल्याचे आडगाव पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानुसार संशयिताचा शोध सुरू असून, मृत महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर संशयितासमवेत प्रेम संबंध होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘टॅटू’नुसार ओळख पटवण्याचे काम सुरू

कन्नमवार पुलाच्या खाली रस्त्याच्या कडेला मंगळवारी (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यांना काम करत असताना एका सुटकेसमधून उग्र दर्प आला. हा दर्प अतिशय तीव्र असल्याने संशय बळावल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर आडगाव पोलिस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून शहानिशा केली असता सदर सुटकेसमध्ये मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर श्वान पथक, न्यायवैद्यक पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू झाला होता. याबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून मृतदेहाच्या हातावर असलेल्या ‘टॅटू’नुसार ओळख पटवण्याचे काम सुरू केले.

सीसीटीव्हीद्वारे माग

बुधवारी (दि. १७) सकाळी मृत महिलेची ओळख पटल्यानंतर संशयिताचाही माग काढण्यात आला. परिसरातील मोबाइल टॉवर लोकेशनवरून ‘सीडीआर’ आणि ‘एसडीआर’ काढण्यात आले असून, त्याचे विश्लेषण सुरू आहे. यासह २८ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनांचा माग काढला जात आहे. मृत महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, प्रेम प्रकरणातून तिच्या प्रियकराने खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

नेमकी घटना काय?

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या कन्नमवार पुलाखाली एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच फॉरेन्सिक टीम व श्वान पथक दाखल झाले असून, याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाता आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *