मनसेने ठाणे आरटीओ कार्यालयातील मराठी वर्ग उधळले, अमराठी उमेदवारांना हुसकावून लावलं

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी येणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्यांच्यावर परिवहन विभागाकडून आगामी काळात कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी प्रशिक्षण वर्गदेखील सुरु केले आहेत. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कमीतकमी जुजबी मराठी बोलता यावी, असा त्यामागचा उद्देश आहे. तसेच परिवहन विभागाकडून परमिट देण्याआधी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे शिक्षण दिलं जात आहे. पण ठाण्यात मराठीचं शिक्षण सुरु असलेला एक वर्ग मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट मराठी उमेदवारांना प्राधान्याने द्यावे, अशी मागणी आंदोलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली.

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात अमराठी रिक्षा – टॅक्सी चालकांना परमिट देण्याआधी सुरु असलेले मराठीचे वर्ग बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. यावेळी मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी मनसैनिकांनी केली. तसेच अमराठी उमेदवारांना या वर्गातून हुसकावून लावले.

मराठी लिहिता वाचता येत नसेल त्या रिक्षा – टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याबाबत परिवहन विभागाने हालचाली सुरु केल्या होत्या. आधी गेल्या १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’च्या मुहूर्तावर ही कारवाई केली जाणार होती. त्यानंतर या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्णय घेतला होता. तसेच १५ ऑगस्टनंतर अशा पद्धतीने कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाने सूचित केले होते.

या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात अमराठी रिक्षा – टॅक्सी चालकांसाठी मराठीचे वर्ग सुरु होते. या ठिकाणी मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसैनिकांनी या अमराठी उमेदवारांना हुसकावून लावले. या परप्रांतीय उमेदवारांना काय शिकविता, पहिले प्राधान्य आपल्या मराठी मुलांना द्या, अशी मागणी या ठिकाणी मोरे यांनी केली. या प्रसंगी मनसे उपशहराध्यक्ष पुष्करराज विचारे, संदीप साळुंखे, प्रशांत पालांडे उपस्थित होते.

 

वाढत्या गुन्हेगारीला बळ, मनसेचा आरोप

महाराष्ट्रात परप्रांतीय रिक्षा – टॅक्सी चालकांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे राज्यात गुन्हे वाढत आहेत. शहरात बेशिस्तपणे पार्किंग करून हे चालक भाडं नाकारतात. ठाण्यात ज्युपिटर रुग्णालयासमोर रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी जाब विचारल्याने ७६ वर्षीय सरोश दस्तूर यांना अमानुष अँप आधारित टॅक्सी चालक निशांत धर शुक्ला (४०) या परप्रांतीय चालकानेच मारहाण केली होती. त्यामुळे या उमेदवारांना प्रोत्साहन न देता आपल्या मराठी मुलांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेचे रवींद्र मोरे यांनी केली. दरम्यान, याबाबत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *