धाराशीवच्या राजकारणातील सर्वात चर्चेच्या घडामोडींमध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेशाबाबत सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. 20 जूनला त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयीन निकालानंतरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय ते घेणार नसल्याचं समजत आहे. दिल्लीतील पक्षाच्या बैठकीलाही ते गैरहजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धाराशिवच्या राजकारणात ओमराजेंच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑपरेशन टायगर यशस्वी?
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’बाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांदरम्यान शिंदे गटाचा दावा कायम आहे की, ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 20 जूननंतरच या संपूर्ण घडामोडींबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. शिंदे गटाच्या मते, सध्या काही राजकीय आणि प्रक्रियात्मक बाबी पूर्ण करायच्या असल्याने अधिकृत घोषणा थांबवण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, तसेच दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने राजकीय सस्पेन्स कायम आहे.
