‘स्मार्ट मीटर नकोच’; मीटरमुळे अवाजवी बील, नागरिकांचा प्रचंड विरोध, महावितरणच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांनी आंदोलन केले. स्मार्ट मीटरमुळे वाढत्या वीज बिलांचा फटका सामान्य ग्राहकांना बसत असल्याचा आरोप करून नागरिकांनी ‘महावितरण’च्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात हे आंदोलन झाले. आंदोलनात दोन हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेऊन ‘महावितरण’च्या कल्याणीनगर शाखेचे अधिकारी दीपक पाटील यांनी प्रतिनिधी म्हणून कनिष्ठ अभियंत्यांना आंदोलनस्थळी पाठवले. स्मार्ट मीटर नको असल्याचे दोन हजारांहून अधिक लेखी अर्ज दिले.

‘अवाजवी वीज बिलांना आळा घाला’

प्रभागाच्या नगरसेविका नंदिनी धेंडे, शीतल सावंत, नगरसेवक सुहास टिंगरे व रवी टिंगरे यांची निवेदने ‘महावितरण’कडे सादर करण्यात आली. या वेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. ‘महावितरण’ची मनमानी बंद करा, स्मार्ट मीटरची सक्ती नको, अवाजवी वीज बिलांना आळा घाला,’ अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. या वेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले.

स्मार्ट मीटर किंवा बिलांबाबत ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. स्मार्ट मीटरविरोधात लोणावळ्यात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यात सहभागी झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘महावितरण’च्या कार्यालयाला टाळे ठोकून स्मार्ट मीटरची तोडफोड केली.

लोणावळ्यात पक्ष एकटवले

‘महावितरण’तर्फे लोणावळा शहर व परिसरातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता ग्राहकांचे जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. काही महिन्यांपासून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत आहे. त्यातच सातत्याने होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक वैतागले आहेत. ‘महावितरण’चा हा अनागोंदी कारभा आणि सक्तीच्या स्मार्ट मीटरमुळे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे प्रशांत भागवत, अनिल गायकवाड, परिजा भिलारे, ज्ञानेश्वर गुंड, नगरसेवक दत्तात्रय येवले, बाळासाहेब जाधव, नगरसेविका ॲड. रेश्मा पाठारे, तर मनसेचे अमित भोसले, लोणावळा शहरप्रमुख नीलेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी पोटफोडे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, वरसोलीचे माजी सरपंच संजय खांडेभराड आदी उपस्थित होते. मीटर तोडफोड केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *