महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी वाढणार? मान्सूनची प्रगती का थंडावली?

राज्यात मान्सूनच्या वाटचालीत मोठा खंड पडला आहे. ६ जूनला मान्सून तळकोकणात दाखल झाल्यानंतर त्याने ८ जूनपर्यंत हर्णे ते सोलापूरपर्यंत मजल मारली; तेलंगणा, झारखंड, बिहार, ओडिशा येथेही आगेकूच केली. मात्र महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल थंडावली आहे. मात्र भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नाराजी आहे. आता २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असे प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

हवामान विभागाने गेल्या आठवड्यामध्ये मान्सूनची महाराष्ट्रात प्रगती नसल्याने महाराष्ट्रातील मान्सूनच्या प्रवासाबद्दल माहिती देणे थांबवले होते. १३ जूनच्या दैनंदिन माहितीमध्ये राज्याचा उल्लेख नव्हता. नंतर, १४ जूनच्या अहवालात महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवसांमध्ये मान्सून आगेकूच करण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यानंतर, पुन्हा १६ जूनला महाराष्ट्राचा उल्लेख या माहितीतून काढून टाकण्यात आला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात मान्सूनच्या वाटचालीची स्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्रात पावसाच्या वाटचालीमध्ये खंड पडल्याचे अखेर प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी संध्याकाळी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. राज्यात आर्द्रता असली, तरी अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त जोरदार वाऱ्यांचा अभाव असल्याने पावसाला चालना मिळत नाही. मान्सूनच्या प्रवाहाशी संबंधित असलेले खालच्या पातळीवरील नैऋत्य वारे अरबी समुद्रावर कमकुवत झाले आहेत. परिणामी महाराष्ट्राची किनारपट्टी आणि अंतर्गत भागांकडे जाणारी आर्द्रता पुरेशा प्रमाणात नाही. पश्चिम हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावरून वाहणारा विषुववृत्तीय प्रवाह नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी आर्द्रतेचा स्रोत म्हणून काम करतो, हा प्रवाह गेल्या काही दिवसांपासून कमकुवत झाल्याने मोसमी वाऱ्यांची हालचाल थंडावली आहे, असे हवामान विभागाने सांगितले. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळे, किंवा पश्चिम किनारपट्टीवरील पुरेशा तीव्रतेची द्रोणीय स्थिती यांसारख्या महत्त्वपूर्ण मान्सून हवामान प्रणाली मान्सूनच्या प्रगतीस मदत करतात, त्यांची यंदा अनुपस्थिती होती. मेडन-जुलियन ऑसिलेशन (एमजेओ) सारख्या प्रणाली सध्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी सकारात्मक ठरण्याची शक्यताही नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

२४ जूननंतरच जोर
हवामानाच्या या परिस्थितीमुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकेल. २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर थोडा वाढू शकेल असे काही मॉडेलवरून दिसत आहे, अशीही माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *