वारकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आळंदीत होणार ‘मेगा टर्मिनल’, तीन वर्षांत मोठे बदल होणार

पुणे रेल्वे स्थानकाची मर्यादित क्षमता लक्षात घेऊन संपूर्ण परिसराचा व्यापक विकास आराखडा तयार केला आहे. येत्या तीन वर्षांत मोठे बदल पाहायला मिळतील. पुण्याच्या भविष्यातील गरजांसाठी उरुळी येथे ‘मेगा टर्मिनल’चे नियोजन केले होते; पण जमीन संपादनासाठीच ३०० कोटी रुपये लागत असल्याचे लक्षात आले. आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे रेल्वेची जागा असून, तेथेच आता अत्याधुनिक ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ उभारण्यात येईल. या ठिकाणी नऊ प्लॅटफॉर्म, सात पिटलाइन आणि १७ स्टेबलिंग लाइन असतील. या ठिकाणी गाड्यांची स्वच्छता व देखभाल केली जाईल. त्यामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली.

‘अमृत भारत एक्स्प्रेस’चाही शुभारंभ

पुणे-शिर्डी नवीन रेल्वेला हिरवा झेंडा आणि पुणे रेल्वे स्थानकावरील नवीन सहा फलाटाच्या कामांचे उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विवेक कोल्हे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हडपसर ते दानापूर ‘अमृत भारत एक्स्प्रेस’चाही शुभारंभ अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.

सहा प्लॅटफॉर्मची उभारणी करून एकूण संख्या १२

वैष्णव म्हणाले, ‘मला नेहमीच पुणे स्थानकाची क्षमता कमी असल्याचे ऐकायला मिळत होते. त्यामुळे यासाठी आम्ही एक व्यापक ‘मास्टर प्लॅन’ तयार केला. फक्त स्टेशनच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा अभ्यास करून सर्वांगीण विकासाचा निर्णय घेतला. त्यानुसार खडकी, पुणे, शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर अशा सर्व स्थानकांचा विचार करून नियोजन करण्यात आले. रेल्वे कामांचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम होतो, हे लक्षात घेऊन समन्वय साधला. पुणे रेल्वे स्थानकावर सध्या असलेले सहा प्लॅटफॉर्म अपुरे ठरत असल्याने आणखी सहा प्लॅटफॉर्मची उभारणी करून एकूण संख्या १२ करण्यात येईल. जुन्या ‘रूट रिले इंटरलॉकिंग’ प्रणालीऐवजी अत्याधुनिक ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ प्रणाली बसवून संपूर्ण ऑपरेशन डिजिटल करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल. पुणे स्थानकावर तिसरे प्रवेशद्वार विकसित करून वाहतूक कोंडी सोडवण्याचाही आराखडा आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पुणे रेल्वे विभागाची एकूण गाड्या हाताळण्याची क्षमता वाढणार आहे.’

तिसऱ्या, चौथ्या लाइनचे काम लवकरच

पुणे-मुंबई मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाईनचे काम लवकरच सुरु होईल. गर्दीच्या मार्गावर तिसऱ्या व चौथ्या लाईनची घोषणा पूर्वीच केली आहे; मंजुरीही दिली आहे. भविष्यात ‘बुलेट ट्रेन’मुळे पुणे-मुंबई प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरे ‘ट्वीन सिटी’ म्हणून विकसित होतील. पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रवासही दोन तासांत शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०२४ नंतर रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक वाढवली असून, महाराष्ट्रासाठी २४ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्यात १३२ रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु असून, त्यापैरी १९ स्थानके पूर्ण झाली आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *