ऐतिहासिक घोडबंदर रस्त्याच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या रस्त्याचे नाव ‘मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग’ असे करण्याची मागणी भाजपच्या वतीने ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तशा प्रस्तावाची सूचना पाटील यांनी महासभेत मांडली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका आणि शासन स्तरावर यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घोडबंदर रस्त्याचे नामांतर करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी याआधी केली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपनेही या रस्त्याचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे थोर पराक्रमी शूर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा आणि स्मृतींचा यतोचित गौरव व्हावा, यासाठी घोडबंदर रोड या महत्त्वपूर्ण मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे.
कृष्णा पाटील यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली आहे. त्यांनी महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबतचे विशेष पत्र दिले असून, या मागणीचा उल्लेख त्यांनी पत्रात प्रामुख्याने केला आहे. चिमाजी अप्पांच्या जाज्वल्य इतिहासाची नवतरुण पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी या मार्गाचे नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग असेच करण्यात यावे, अशी विनंती पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
थोर योद्धयाला मानाचा मुजरा
चिमाजी अप्पांनी वसईच्या लढ्यात दाखवलेले शौर्य हे मराठ्यांच्या लष्करी इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन घोडबंदर मार्गाला त्यांचे नाव दिल्यास, तो या थोर योद्ध्याला मानाचा मुजरा ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
१२ व्या शतकात संदर्भ
घोडबंदर रस्त्याच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसरीकडे विस्तृत खाडीकिनारा अस्तित्वात आहे. या किनाऱ्यावर १२ व्या शतकापासून अरब आणि पर्शियन देशांतून व्यापारी जहाजांद्वारे उच्च प्रजातीचे घोडे या खाडीच्या बंदरात आणले जात होते. घोड्यांचा व्यापार होत असल्यामुळे या ठिकाणाला ‘घोडेगाव’ अर्थात घोड्यांचे गाव आणि त्यानंतर ‘घोडबंदर’ असे नाव देण्यात आले.

