पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान
संतोष पोंदे असे या बाधित शेतकाऱ्याचे नाव असून, ते गेल्या 15 वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये एकूण 3700 कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे सोमवारी संध्याकाळी खाद्य टाकण्यासाठी गेले असता, त्यांना कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या. या दुर्दैवी घटनेत 3700 पैकी केवळ 100 कोंबड्या जिवंत राहिल्या असून, तब्बल 3600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कोंबड्यांचं निधन झाल्याने शेतकऱ्याचे सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तपास सुरु
एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा अचानक मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कृषी अधिकाऱ्यांनी आणि संबंधित प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे पोंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
कशामुळे झाला असावा?
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघात असण्याची शक्यता आहे. काही मृत कोंबड्यांचे अवयव तपासणीसाठी पुणे येथील अँनिमल डिसीज इन्व्हेस्टिगेशन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. तपास अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. बर्ड फ्लू किंवा इतर संसर्गजन्य रोगाचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळी जाऊन पंचनामा
पंचायत समिती सदस्य अंकिता वळुंज, माजी अध्यक्ष अनिल वळुंज, कोतवाल विकास ढबाडे यांनी मंगळवारी सकाळी भेट देऊन माहिती घेतली. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. प्रशांत साळवे, डॉ. वसंतराव वळुंज, डॉ. संजय पांडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
इतर पोल्ट्री मालकही चिंतेत
या भागामध्ये संतोष पोंदेंप्रमाणे अनेक पोल्ट्री चालक आहेत. त्यामुळेच ही घटना परिसरात खळबळ उडवून देणारी ठरली असून पोल्ट्री मालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एकाच वेळी संतोष पोंदेंच्या पोल्ट्रीमधील 3600 कोंबड्या कशा दगावल्या यासंदर्भातील अधिकृत अहवाल येताच कारण स्पष्ट होईल.
