नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग; 34 गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया, कोणत्या गावांचा समावेश? शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार?

नाशिकरोड-साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, जिल्हा प्रशासनाने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण ३४ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार असून, त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील २३ आणि नाशिक तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. सोमवारनंतर संपादित होणाऱ्या गट क्रमांकांची यादी प्रसिद्ध होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील प्रक्रियेकडे लागले आहे. तसेच आपल्याला मोबदला किती मिळणार? यावरही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारच्या अधिसूचनेनुसार भूसंपादनाची कार्यवाही

मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार रेल्वे अधिनियम १९८९ (सुधारित २००८) आणि केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, सिन्नर तालुक्यातील गावांची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे, तर नाशिक तालुक्यातील गावांची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, प्रस्तावित रेल्वेमार्गाची अंतिम लांबी, स्थानकांची संख्या अथवा त्यांची ठिकाणे याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंत्रणेमार्फत मार्गाचे आरेखन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी फेरसर्वेक्षणानंतर किरकोळ बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *