मान्सूनची वाटचाल थांबली, मुंबईसह कोकणात पावसासाठी 25 जूनची प्रतीक्षा, तीन दिवस उष्णतेच्या लाटेची परिस्थिती

मान्सूनची वाटचाल थांबली, मुंबईसह कोकणात पावसासाठी 25 जूनची प्रतीक्षा, तीन दिवस उष्णतेच्या लाटेची परिस्थिती

राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल गेल्या आठवड्यापासून जवळपास थांबली असून, २५ जूननंतरच त्याला मान्सूनला गती मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या कोकणातील हर्णै ते सोलापूर या पट्ट्यात स्थिरावलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याची प्रगती मंदावली आहे.

मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे

निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायव्येकडून वाहणारे उष्ण वारे, अरबी समुद्रातील साडेतीन ते चार किलोमीटर उंचीवरील प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली आणि कमकुवत मान्सूनचा प्रवाह यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आठ जूनपासून महाराष्ट्रातील मान्सूनरेषेत विशेष बदल झालेला नाही.

२५ जूननंतर मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता

मात्र, २३ जूनच्या सुमारास वातावरणात काहीसा बदल होण्याची शक्यता असून, त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. २५ जून ते एक जुलै या कालावधीत मुंबईसह संपूर्ण कोकणात चांगल्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मान्सून मुंबईत स्थिरावल्यानंतर सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही त्याची प्रगती होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *