नऊ महिन्यांच्या स्थगितीनंतर मुंबई मोनोरेल लवकरच पुन्हा सुरू होणार असून, यासोबत भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. नवीन गाड्या खरेदी करण्याचा खर्च आणि वाढलेला देखभाल खर्च भरून काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) तिकीट दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र सरकारने याला मंजुरी दिल्यास, 2014मध्ये मुंबई मोनोरेल सुरू झाल्यापासून ही दुसरी भाडेवाढ ठरेल. भारतातील एकमेव मोनोरेल चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल) दरम्यानच्या 19.54 किमी लांबीच्या मार्गावर धावते.
मोनोरेलचे भाडे साधारणपणे मुंबई मेट्रोच्या भाड्याच्या बरोबरीने
एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार, 3 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी नवीन किमान भाडे 5 रुपयांवरून 10 रुपये होण्याची शक्यता आहे. 3-6 किमीसाठी 20 रुपये, त्यानंतर 6-9 किमीसाठी 30 रुपये, 9-12 किमीसाठी 40 रुपये, 12-15 किमीसाठी 50 रुपये, 15-18 किमीसाठी 60 रुपये आणि 18 किमी व त्यावरील अंतरासाठी 70 रुपये भाडे असण्याची शक्यता आहेत. सुधारित रचनेमुळे मोनोरेलचे भाडे साधारणपणे मुंबई मेट्रोच्या भाड्याच्या बरोबरीने येईल, जिथे पहिल्या 3 किमीसाठी 10 रुपये आकारले जातात, मात्र त्यानंतरचे भाड्याचे टप्पे वेगळे आहेत.
2014 मध्ये जेव्हा मोनोरेलची सेवा सुरू झाली, तेव्हा सुरुवातीचे भाडे दर पहिल्या 3 किमीसाठी 5 रुपये, 3-5 किमीसाठी 7 रुपये, 5-10 किमीसाठी 9 रुपये, 10-15 किमीसाठी 14 रुपये, 15-20 किमीसाठी 15 रुपये आणि 20 किमी पेक्षा जास्त अंतरासाठी 19 रुपये असे होते. 2018 मध्ये भाडे सुधारित करून 0-3 किमीसाठी 10 रुपये, 3-12 किमीसाठी 20, 12-18 किमीसाठी 30 रुपये आणि 18 किमीपेक्षा जास्त अंतरासाठी 40 रुपये असं करण्यात आलं आहे.
तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल सेवा थांबवली
संचालन आणि देखभालीचा वाढता खर्च, तसेच हैदराबादस्थित मेधा सर्वो ड्राईव्ह्सकडून नवीन गाड्यांची खरेदी, यांमुळे भाडेवाढ करणं आवश्यक झालं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सप्टेंबर 2025 मध्ये तांत्रिक बिघाडांमुळे जीवितहानी झाल्यानं मोनोरेल सेवा थांबवण्यात आल्या. तेव्हापासून, या नेटवर्कमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये गाड्यांचा ताफा अद्ययावत करणे, आधुनिक कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग आणि रुळांची दुरुस्ती यांचा समावेश आहे.
अनेकदा पांढरा हत्ती म्हणून टीका
मेट्रो रेल्वे सुरक्षा विभागाचे निवृत्त आयुक्त पी. एस. बघेल यांच्याकडून मिळालेल्या तीन महत्त्वपूर्ण सुरक्षा मंजुऱ्यांपैकी शेवटची मंजुरी या महिन्याच्या सुरुवातीला मिळाली. तथापि, महाराष्ट्र सरकारकडून अंतिम मंजुरी अद्याप अपेक्षित आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव सध्या राज्याच्या नगरविकास विभागाकडे आहे.
अनेकदा पांढरा हत्ती म्हणून टीका होणाऱ्या मुंबई मोनोरेलमुळे एमएमआरडीए (MMRDA) आणि तिची वाहतूक शाखा, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 2025-26 मध्ये या प्रकल्पाला 460.26 कोटी रुपयांचा तोटा झाला, तर 2024-25 मध्ये हा तोटा 476.76 कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 57.26 कोटी रुपये होता. अधिकाऱ्यांनी अलिकडच्या वर्षांतील या वाढीव तोट्याचं मुख्य कारण नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी झालेला भांडवली खर्च असल्याचं सांगितलं.
दरम्यान, सेवा स्थगित होण्यापूर्वी, मोनोरेल दररोज अंदाजे 18 हजार प्रवाशांची वाहतूक करत होती. तर 2025 च्या पावसाळ्यात ही प्रवासी संख्या जवळपास 20 हजारपर्यंत वाढली होती. आता लवकरच मोनोरेल तुमच्या सर्वांच्या सेवेत पुन्हा हजर होणार आहे, अन् तुमचा प्रवास सुखकर करणार आहे.

