दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सब वे पाण्याखाली जातो आणि त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसतो. अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी मुंबई महापालिका विविध पर्यायांचा विचार करत आहे. यामध्ये पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा, यासाठी सब वे खालीच भूमिगत टाकी बांधण्याचे नियोजन आहे. ‘भूमिगत टाकीमुळे सब वेमध्ये पाणी साचू लागताच ते त्वरित भूमिगत टाकीत जाईल आणि हेच पाणी नंतर पंपच्या साह्याने हळूहळू बाहेर काढले जाईल. यासंदर्भात लवकरच महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ आणि अन्य पर्यायांचाही विचार करून सब वे पूरमुक्त करण्याचा प्रयत्न करू’, असे आश्वासन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिले.
सब वेतील पाण्याच्या समस्येवर चर्चा
मुंबईत नुकताच मान्सूनपूर्व पाऊस पडला आणि अंधेरी सब वे पाण्याखाली गेला. यामुळे काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला. अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, मोगरा नाला पम्पिंग स्टेशनच्या कामाची प्रगती काय आहे, असे प्रश्न स्थायी समिती सदस्य आणि भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी समितीच्या बैठकीत उपस्थित केले. तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी, ‘अंधेरी सब वे नेहमीच पाण्याखाली जातो. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय आहेत, तसेच मोगरा पम्पिंग स्टेशनच्या कामाची स्थिती काय आहे’, असे प्रश्न विचारले.
आता सब वेखालीच टाकीचा विचार
यावर उत्तर देताना बांगर यांनी, ‘अंधेरी सब वे तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत २५ ते ३० वेळा पाण्याखाली जातो. त्याच्या आजूबाजूला असलेले चार नाले, पाण्याचा मोठा वाहता प्रवाह आणि ५५ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास इथे पाणी तुंबते. हा सब वे पूरमुक्त करण्यासाठी तीन ठिकाणी पाणी साठवण टाक्या बनवण्याचा विचार आहे. यामध्ये एकूण ४१ हजार क्युबिक मीटर पाणी साठवण क्षमता असेल. ५५ मिमी पाऊस पडला, तर सब वेमध्ये सव्वा ते दीड लाख क्युबिक मीटर पाणी साचते. परिणामी, या टाक्याही अपुऱ्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष अंधेरी सब वेच्या खालीच भूमिगत टाकी बनवण्याच्या पर्यायांचा विचार करत आहोत. त्यामुळे सब वेऐवजी या टाकीत पाणी साचेल आणि अंधेरी सब वे पूरमुक्तच राहील. हे पाणी नंतर पंपाद्वारे अन्यत्र सोडले जाईल. याबाबत तीन ते चार दिवसांत निर्णय घेऊ’, अशी माहिती दिली.
कामासाठी काही महिने सब वे बंद ठेवावा लागणार
अर्थात, हे काम करण्यासाठी अंधेरी सब वे काही महिने बंद ठेवून येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याशिवाय पर्याय नसणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
