“माझं सचिनसोबत लग्न लावून द्या, नाहीतर आम्ही पळून जाऊ”, असा थेट घरच्यांना दम देणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन नवरीला लग्नगाठ बांधण्यापूर्वीच दामिनी पथकाची एन्ट्री होताच चांगलंच कापरं भरलं. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात शुक्रवारी या बालविवाहाच्या मांडवात अभूतपूर्व हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांची गाडी येताच नवरीच्या वेशभूषेतील मुलगी आणि नवरदेवाने लग्न मंडपातून थेट धूम ठोकली. अखेर दीड तासाच्या थरारानंतर पोलिसांनी दोघांना शोधून काढत हा बालविवाह यशस्वीपणे रोखला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरातील एका गरीब कुटुंबातील १७ वर्षांची समीक्षा (नाव काल्पनिक) नुकतीच १० वीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिचे वडील प्लंबिंगचे काम करतात तर आई परिसरामध्ये धुण्या-भांड्याचे काम करते. समीक्षाचे तिच्या आत्याचा मुलगा सचिन (नाव काल्पनिक आहे) वय २३, व्यावसायिक- प्लंबिंग याच्याशी प्रेमसंबंध होते. १० वी पास होताच समीक्षाने घरात लग्नाचा तगादा लावला. सुरुवातीला पालकांचा विरोध होता, मात्र लग्न लावून नाही दिलं तर पळून जाऊ, असा दमच समीक्षाने दिल्याने गरीब पालकांनी अखेर हार मानली. बुधवारी दोघांना हळद लागली आणि आज शुक्रवारी विवाहाचा मुहूर्त होता.
नातेवाईकांचा वास्तूशांतीचा बनाव; वय निघालं १७ वर्ष
शाळेच्या मैदानावर विवाहाची जय्यत तयारी झाली होती. नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते, जेवणाचा बेतही तयार होता. मात्र, एका जागरूक नागरिकाने पोलिसांच्या कंट्रोल रूमला तिथे बालविवाह होत असल्याची टीप दिली. माहिती मिळताच दामिनी पथक आणि अंगणवाडी सेविका आरती काळे आणि रंजना निकाळजे मंडपात पोहोचल्या. पोलिसांना पाहताच नातेवाईकांनी आमच्या घरात वास्तूशांतीचा कार्यक्रम आहे, असा खोटा बनाव रचला. मात्र, पथकाने नवरीच्या वेशभूषेतील मुलीचे वय तपासण्यासाठी ओळखपत्राची मागणी केली. तेव्हा तिच्या वयाचा अधिकृत पुरावा तपासला असता, तिचे वय अवघे १७ वर्ष असल्याचे उघड झाले.
पोलीस येताच नवरदेव-नवरीने ठोकली धूम
आपलं बिंग फुटल्याचं आणि पोलीस आता कारवाई करणार याची कुणकुण लागताच, लग्नाचा हट्ट धरणारी समीक्षा आणि नवरदेव सचिन या दोघांचीही बोलती बंद झाली. त्यांनी मंडपातून थेट धूम ठोकली आणि ते लपून बसले. तब्बल एक ते दीड तास हे नवविवाहित जोडपे अज्ञात स्थळी लपून होते, ज्यामुळे मंडपात एकच गोंधळ उडाला. अखेर दामिनी पथकाने नातेवाईकांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवून विश्वासात घेतले आणि समजावून सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी संपर्क करून त्या दोघांना पुन्हा मंडपात बोलावले.
दामिनी पथकाने दोन्ही बाजूच्या आई-वडील आणि मुला-मुलीला बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार समज दिली. आपली चूक उमजल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तिचा विवाह लावून देऊ, असे लेखी आश्वासन प्रशासनाला दिले.
हा बालविवाह रोखण्यात पोलीस उपनिरीक्षक पीएसआय मिरधे, यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, महिला पोलीस सुनिता नागलोद, मोनिका दीवे,कल्पना नागरे आणि पोलीस शिपाई संकपाळ तसेच महिला व बालविकास समितीच्या/प्रकाश नगरच्या अंगणवाडी सेविका आरती काळे व रंजना निकाळजे यांच्या पथकाने हा बालविवाह थांबवण्याची मोठी कामगिरी केली.
