कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

बस कल्याण आगारात जाणार नसल्याचे सांगून प्रवाशांना पत्रीपुलावर किंवा सूचक नाक्यावरच उतरवले जात आहे. या प्रवाशांना रिक्षासाठी तब्बल १०० ते १५० रुपये मोजून आधी कल्याण स्टेशन आणि त्यानंतर तिथून आपल्या अपेक्षित स्थळी जावे लागते. मागील सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हा ‘द्राविडी प्राणायाम’ कधीतरी संपावा आणि एसटी प्रवाशांना किमान कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरापर्यंत बस सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्रासलेल्या प्रवाशांकडून होत आहे.

पाच वर्षांनंतरही काम अपूर्णच

कल्याण स्टेशन परिसरात ‘सॅटीस’सह परिसर विकास प्रकल्पाचे काम २०२१पासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षांतही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. याच प्रकल्पाचा भाग म्हणून एसटी आगाराचा विकास आणि बहुउद्देशीय बहुमजली इमारतीचे काम सुरू आहे. हे काम आणि उड्डाणपूल आगारात उतरवण्याच्या कामासाठी कल्याण आगार विठ्ठलवाडीत हलवण्यात आले आहे.

‘वर्षभरात एसटी प्रवाशांना कल्याण आगारातून प्रवास करता येईल,’ असे आश्वासन स्मार्ट सिटी आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, इमारतीचे काम अजूनही पायापर्यंतच रखडलेले आहे. तर पडघा, भिवंडीकडे जाणाऱ्या बसेससाठी रेल्वे स्थानक परिसरात तात्पुरती जागा दिली असली, तरी अनेक गैरसोयी आहेत..

अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद आणि कोकणातून येणाऱ्या गाड्यांना कल्याण डेपोत प्रवेश बंद आहे. या गाड्या गोविंदवाडी किंवा पत्रीपूल मार्गे कल्याण पूर्वेतून विठ्ठलवाडी आगारात जातात. त्यामुळे पत्रीपूल, नेतिवली नाका किंवा सूचक नाका परिसरात कल्याण पश्चिमेकडील प्रवाशांना उतरवले जाते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांकडे सामानाचे मोठे ओझे असते. अशा वेळी अर्ध्या रस्त्यात उतरलेल्या प्रवाशांची असहाय्यता पाहून रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत त्यांची लूट करतात.

प्रवाशांचे मोठे हाल

“कल्याणातील डेपो आणि आगाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाकडून डिसेंबर २०२६ची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत हे काम पूर्ण झाले, तर प्रवाशांचे हाल कमी होतील.” चेतन देवधर, आगार व्यवस्थापक

“अलिबागहून येणारी बस सूचक नाक्यावर किंवा डोंबिवली मार्गे आली तर पत्रीपुलावर प्रवाशांना उतरवते. तिथून कल्याण पश्चिमेकडे जाण्यासाठी रिक्षाचालक थेट १०० रुपयांची मागणी करतात. अर्ध्या रस्त्यात उन्हातान्हात होणाऱ्या हालाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.” भूषण जोशी, प्रवासी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *