अंधेरीतील लोखंडवाला परिसर आणि गोरेगावदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना येत्या काही वर्षांत मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम उपनगरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन गोरेगाव खाडीवर सहा पदरी केबल-स्टेड पूल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. सुमारे ४१८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे अंधेरी, ओशिवरा आणि गोरेगाव यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार असून लोखंडवाला जंक्शनमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
उत्तर-दक्षिण मार्ग उपलब्ध होणार
हा पूल पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरांमध्ये पर्यायी उत्तर-दक्षिण मार्ग उपलब्ध होईल. ओशिवरा आणि गोरेगाव परिसराला जोडण्यात हा पूल महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच, परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासह परिसरात प्रस्तावित अन्य विकासकामांमुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीच्या गरजाही या पुलामुळे पूर्ण होऊ शकतील.
बांधकामाचा कालावधी कमी करण्यासाठी महापालिकेने केबल-स्टेड डिझाइनची निवड केली आहे. या प्रकारच्या पुलासाठी तुलनेने कमी खांबांची आवश्यकता भासते. त्यामुळे खाडीतील जागेचा वापर कमी होतो आणि पर्यावरणावर होणारा परिणामही मर्यादित राहतो. तसेच, बांधकाम अधिक वेगाने पूर्ण करणे शक्य होते.
कसा असेल पूल?
या पुलाची एकूण लांबी ५४२ मीटर असून त्यापैकी २३८ मीटरचा भाग केबल-स्टेड स्वरूपाचा असेल. पुलाची एकूण रुंदी २८.५५ मीटर असेल. सहा पदरी मार्गात प्रत्येकी तीन लेन उत्तर आणि दक्षिण दिशेकडील वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय विविध सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र जागाही राखीव ठेवण्यात येणार आहे.
मुंबईतील एस. व्ही. रोड आणि लिंक रोड हे प्रमुख उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग असून दिवसभर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेषतः मिल्लत नगरजवळील लोखंडवाला सर्कल परिसरात वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर ओशिवरा आणि भगतसिंह नगर या महत्त्वाच्या मार्गांना लिंक रोडशी जोडणारा गोरेगाव खाडीवरील पूल महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. त्यामुळे लोखंडवाला सर्कलमधील वाहतुकीचा ताण कमी होऊन अनेक वाहनचालकांना सिग्नलमुक्त प्रवासाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
