भाईंदरचा ‘तो’ बॉटल नेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदच, वादग्रस्त पुलाच्या उद्घाटनासाठी नेते मंडळी अनिच्छुक

भाईंदरच्या गोल्डन चौकातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या वादग्रस्त ‘बॉटल नेक’ पुलाचे काम ‘एमएमआरडीए’कडून पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, उद्घाटन न झाल्याने तो वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. परिणामी, अद्यापही वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिरा-भाईंदर शहरात प्रवेशासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल्डन नेस्ट हा एकमात्र मुख्य रस्ता आहे. या मार्गालाच अनेक पर्यायी रस्ते जोडलेले आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील चौकांमध्ये नेहमी वाहतूककोंडी होते. या समस्येतून नागरिकांची सुटका करण्याच्या दृष्टीने ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून नागपूरच्या धर्तीवर मिरा-भाईंदरमध्ये मेट्रोला समांतर तीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तीन पूल उभारण्यात आले असून, त्यातील दोन सेवेत आले आहेत. गोल्डन चौकातील तिसऱ्या पुलाचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, या पुलाची छायाचित्रे ‘बॉटल नेक’ पूल नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाली.

गोल्डन नेस्टहून चढण्यासाठी दोन अधिक दोन असा चार पदरी असणारा हा पूल आझादनगरजवळ उतरण्यासाठी दोन पदरी होत असल्याने टीका आणि आरोप झाले. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने तज्ज्ञांच्या मदतीने पुलाचे सर्वेक्षण करत त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील काही महिने पुलात सुधारणा करण्याचे काम सुरू होते. तेदेखील दीड दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, त्यानंतरही हा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. काही कामे प्रलंबित असल्याचे कारण याबाबत ‘एमएमआरडीए’कडून पुढे केले जात आहे. मात्र, दीपक हॉस्पिटल सिग्नल व गोल्डन चौकातील वाहतूककोंडीमुळे प्रवास त्रासदायक ठरत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याची मागणी होत आहे.

नेते मंडळी अनिच्छुक

विविध विकासकामांच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये वरचढ पाहायला मिळते. मात्र, ‘बॉटल नेक’ पूल वादग्रस्त ठरल्यामुळे त्याच्या उद्घाटनासाठी स्थानिक नेते उत्सुक नसल्याचे समजते. ‘एमएमआरडीए’ नेच उद्घाटन करून तो खुला करावा, अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *