मुंबईकरांची बसगाड्यांची वाढती मागणी पाहता ‘बेस्ट’ उपक्रमाने आणखी १ हजार ५०० मिडी इलेक्ट्रिक एसी बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. १२ वर्षांसाठी या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-बस सेवा अंतर्गत या बस सेवेत दाखल होतील. आधीच साडेचार हजार एसी इलेक्ट्रिक बसगाड्यांचे काम ‘ऑलेक्ट्रा’ कंपनीला दोन ते तीन वर्षापूर्वी देऊनही ७३५ एसी बसच सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसगाड्या दाखल होण्याचे प्रमाण कमी असताना ‘बेस्ट’कडून आणखी दीड हजार बस घेण्यात येणार आहेत.
कमी होणारी बससंख्या आणि नव्याने दाखल न होणाऱ्या बसगाड्यांमुळे मुंबईतील अनेक भागांत प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. सध्या मुंबईत २ हजार ७९२ बसगाड्या असून, यामध्ये ‘बेस्ट’च्या स्वमालकीच्या २४९, तर भाडेतत्त्वावरील २ हजार ५४३ बस आहेत. यामध्ये ‘बेस्ट’ उपक्रमाच्या २४९ मालकीच्या असलेल्या बसमध्ये ३७ बस महिलांसाठीच्या तेजस्विनी मिडी बस आहेत. त्याव्यतिरिक्त ‘बेस्ट’ उपक्रमाकडे स्वमालकीच्या बस नाहीत. तर, भाडेतत्त्वावरील ६२५ मिडी बस आहेत. आता मिडी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय ‘बेस्ट’ उपक्रमाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून मिडी एसी इलेक्ट्रिक बस घेण्यात येणार आहेत. नऊ मीटर लांबीच्या असलेल्या या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बारा वर्षासाठी या बस भाडेतत्त्वावर
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत याबाबत निविदा काढून दोन कंपन्यांचीही निवड करण्यात आली आहे. १२ वर्षासाठी या बस भाडेतत्त्वावर घेताना त्यासाठी मोठी रक्कम ‘बेस्ट’ उपक्रम मोजणार आहे. सध्या या बस गाड्या घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी ‘बेस्ट’ समितीचीही मंजुरी यासाठी लागणार आहे. साधारण गणेशोत्सव किंवा दिवाळीनंतर या बस टप्प्याटप्याने ताफ्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट ‘बेस्ट’ उपक्रमाने ठेवले आहे. मेट्रो, रेल्वे स्थानक परिसरासह मुंबईतील टेकडीवरील रस्त्यांवर या बस चालवल्या जातील. मिडी बस काही वर्षांपूर्वी ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. मात्र, ‘बेस्ट’ने मालकीच्या आयुर्मान संपलेल्या मिडी बस भंगारात काढणे, मालकीच्या व खासगी मिडी बसगाड्यांविरोधात प्रवाशांच्या विविध तक्रारी आदी कारणांमुळे त्यांची संख्या रोडावली.
