ठाणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा; 12 जूनला 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद

राज्यात अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याशिवाय शहरी भागांमध्येही पाणी कपातीचं संकट ओढावणार असल्याची चर्चा आहे. कमी पर्जन्यमानाच्या संकटाची टांगती तलवार असतानाच ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यात येत्या शुक्रवारी पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती आहे. हा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद केला जाणार असल्याची माहिती आहे. जलवाहिनीच्या कामकाजांसाठी पाणी पुरवठा खंडीत केला जाणार असल्याची माहिती आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीएमार्फत आनंदनगर ते साकेत पर्यत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरा नगर संपकडे जाणारी 813 मि.मी व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीएकडून 900 मि.मी व्यासाची जलवाहिनी 2200 मीटरपैकी 800 मीटर अंतरापर्यत अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. 800 मीटर अंतरापर्यत अस्तित्वातील 813 मि.मी व्यासाची जलवाहिनी निकामी करुन नव्याने अंथरण्यात आलेली 900 मि.मी व्यासाची जलवाहिनी कार्यान्व‍ित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. सदर कामाकरिता शुक्रवारी 12 जूनला सकाळी 9.00 ते शनिवारी 13 जूनला सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ठाण्यात कोणकोणत्या भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार?

या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नं. 2,3, व 4, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी.पी.तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपरुवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबईत 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय

दरम्यान, धरणांमध्ये केवळ 40 दिवसांचा पाणीसाठा असल्याने मुंबईत 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त याआधीच समोर आलं आहे. मुंबईत अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नाही. येत्या काही दिवसांमध्ये कदाचित मुंबईत मान्सून दाखल होईल. तोपर्यंत तरी मुंबईकरांवर 10 टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा होतो. पण यावर्षी अल निनोचं संकट असल्याने मुंबईकरांसाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *