भारतामध्ये मोठी नोकरकपात करण्यात आली आहे. अमेरिकेतील रिअल इस्टेट तंत्रज्ञान कंपनी ‘ओपनडोअर’ने (Opendoor) भारतातील आपलं कामकाज बंद करणार असल्याचं जाहीर केलं आहे. कंपनीच्या या निर्णयाचा फटका भारतातील सुमारे 250 कर्मचाऱ्यांना बसणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काझ नेजाशियन (Kaz Nejatian) यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. उद्योगामध्ये परिवर्तन होत असून त्यातील धोरणाचा भाग म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला असून, कामकाजाशी संबंधित पदं अमेरिकेतील ग्राहकांच्या अधिक जवळ नेत आहोत असं सांगितलं आहे.
या निर्णयामागील कारणांचा उलगडा करताना त्यांनी सांगितलं की, “ओपनडोअरचे ग्राहक अमेरिकेत आहेत. अशा स्थितीत त्यांना सेवा देण्यासाठी लागणारं सर्व कामकाज त्यांच्या अगदी जवळून करण्याची गरज असून ते जास्त सोयीचं आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, कंपनीने यापूर्वी विविध प्रणालींमधील ‘मॅन्युअल वर्कफ्लो’ (मानवी हस्तक्षेपाने चालणारी कार्यप्रक्रिया) हाताळण्यासाठी भारतात एक मोठी टीम तयार केली होती. मात्र तंत्रज्ञानात झालेले बदल आणि अमेरिकेत ‘एआय’ (AI) युक्त टीम्सच्या वापरामुळे ही कामे परदेशातून करून घेण्याची गरज आता कमी झाली आहे.
Kaz Nejatian यांनी भारतातील टीमच्या कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी त्यांनी भारतातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केलं आणि ते कौशल्यवान तसंच गुणवंत असून इतर संस्थांसाठीही मोलाची भर ठरतील असं म्हटलं आहे.
कंपनीने सांगितलं की, प्रभावित कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती पॅकेज, नोकरी शोधण्यात मदत करणाऱ्या सेवा आणि इतर सहाय्य मिळेल. बदल होत असाना मदतीसाठी काही मोजके कर्मचारी तात्पुरते थांबतील.
कर्मचारी संख्या कमी करूनही ‘ओपनडोअर’ मजबूत स्थितीत असल्याचं आणि कंपनीच्या एकूण व्यावसायिक धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचं Kaz Nejatian यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेतील घरमालकांना सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करत असतानाच, कामकाज सुलभ करणे, एकसमान व्यासपीठ विकसित करणे आणि मानवी हस्तक्षेपावर आधारित प्रक्रियांवरील अवलंबित्व कमी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
