७ वीतील मुलीला नशेचं औषध पाजलं, बेशुद्ध होताच काका-पुतण्याकडून अत्याचार; नंतर व्हिडिओही बनवले, अखेर नराधमांना अटक

शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. काका आणि पुतण्याने मिळून सातवीत शिकणाऱ्या एका निष्पाप चिमुरडीला नशेचे औषध पाजले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली. कृष्णा सोळुंके आणि किशोर सोळुंके अशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपी काका-पुतण्याची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपींची आधीपासून ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला एका रूमवर नेले. तिथे तिला शीतपेयातून किंवा अन्नातून नशेचे औषध पाजले. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर या दोन्ही नराधम भावांनी आळीपाळीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचार करताना या नराधमांनी चिमुरडीचे मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले. त्यानंतर हे व्हिडिओ मुलीच्या आत्याच्या मोबाईलवर पाठवून दिले. “जर आम्हाला पैसे दिले नाहीत, तर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुमच्या कुटुंबाची बदनामी करू,” अशी धमकी देत त्यांनी खंडणी मागण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे पीडितेचे कुटुंब पुरते हादरून गेले होते.

जवाहरनगर पोलिसांची तत्परता; टीव्ही सेंटरच्या बारमधून आरोपी जेरबंद

पीडित मुलीचे नातेवाईक जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याने त्यांनी सुरुवातीला तिथे धाव घेऊन तक्रार दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि टीव्ही सेंटर भागातील एका बारमधून या दोन्ही आरोपींना मद्यधुंद अवस्थेत रंगेहात ताब्यात घेतले. हा सर्व गुन्हा उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे जवाहरनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. या गंभीर प्रकरणात पोलीस आता पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *