विवाह जुळवणाऱ्या (मेट्रोमोनियल ) संकेतस्थळावरुन एका महिलेला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी विवाह केल्यानंतर परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सुरेश रविंद्र (३७) याला ठाणे पोलिसांनी दिल्ली विमानताळावरुन अटक केली आहे. रशियावरुन भारतात येताच त्याला पकडण्यात आले असून या आरोपीने तक्रारदार महिलेसह अन्य चार महिलांची फसवणूक केल्याची बाब चौकशीत उघड झाली आहे.
मेट्रोमोनियल संकेतस्थळावरुन आरोपीने तक्रारदार महिलेला विनंती पाठवली. नंतर त्याने तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक करीत तिच्याशी मंदिरात विवाह केला. विवाह झाल्यानंतर तिला ऑस्ट्रोलिया, रशियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून त्याने महागडी कार आणि ४८ लाख रुपये घेतले. ही रक्कम आरोपीने देश, परदेशात मौजमजा करण्यासाठी पब, हॉटेलमध्ये खर्च केली असून महिलेने पैशाची मागणी केल्यानंतर त्याने तिला मोबाइलमध्ये शरीसंबधांचे चित्रीकरण केलेले व्हिडीओ प्रासारित करण्याची धमकी दिली होती. महिलेच्या तक्रारीनंतर ११ मे रोजी ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलिस निरीक्षक विजयकुमार सरनाईक यांच्या पथक या गुन्ह्याचा तपास करीत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सुरेश रविंद्र रशियाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एलओसी काढली. रशियावरुन नवी दिल्ली विमानतळावर आलेल्या सुरेश याला इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेत याविषयी ठाणे पोलिसांना कळवले. कासारवडवली पोलिसांचे पथक तात्काळ दिल्लीला रवाना झाले आणि सुरेश याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने तक्रारदार महिला आणि इतर चार महिलांची फसवणूक केल्याचे मान्य केले आहे.
तेलंगणामध्ये गुन्हा
अशाप्रकारे आरोपीने अन्य महिलेशी विवाह करुन तिचे शारीरिक शोषण करीत तिच्याकडून १५ लाख आणि या महिलेच्या मित्रांना युरोपमध्ये नोकरी लावण्यासाठी १८ लाख रुपये घेऊन ३३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तेलंगणातील अल्लापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. आंध्रप्रदेशमधील एका महिलेकडूनही आरोपीने ९ लाख रुपये घेतल्याची बाब चौकशीमध्ये उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
