₹6000 पगारापासून ₹2000000000 संपत्तीपर्यंत! सरकारी अधिकाऱ्याच्या घरातलं घबाड पाहून अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले!

अवघ्या 6 हजार रुपयांच्या मासिक पगारावर नोकरीची सुरुवात करणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याकडे किती संपत्ती असेल? कधी विचार केलाय. अगदी जास्तीत जास्त लाखाच्या घरात असं उत्तर तुम्ही द्याल. पण काही वर्षांतच शेकडो कोटींची मालमत्ता जमवल्याचा संशय एसीबीने व्यक्त केलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने टाकलेल्या छाप्यात इतकी मोठी संपत्ती उघडकीस आली की अधिकारीही काही काळ अवाक झाले. प्राथमिक तपासात या अधिकाऱ्याशी संबंधित मालमत्ता, रोख रक्कम, जमीन आणि इतर गुंतवणुकींची एकूण किंमत सुमारे 200 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समोर आले आहे.

साध्या नोकरीतून सुरू झाला प्रवास

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्याने कारकिर्दीच्या सुरुवातीला अत्यंत कमी वेतनावर सरकारी सेवेत प्रवेश केला होता. मात्र कालांतराने त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्थावर आणि जंगम मालमत्ता जमा झाल्याचा संशय निर्माण झाला. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अनेक पटीने जास्त मालमत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसीबीने चौकशी सुरू केली.

अनेक ठिकाणी एकाच वेळी धाड

एसीबीच्या विशेष पथकाने संबंधित अधिकारी आणि त्याच्या निकटवर्तीयांशी संबंधित विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. घर, कार्यालय, नातेवाईकांची ठिकाणे आणि कथित बेनामी मालमत्तांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि गुंतवणुकीची माहिती हाती लागली. प्राथमिक तपासातच संपत्तीचा आकडा प्रचंड असल्याचे स्पष्ट झाले.

जमीन, घरे, फ्लॅट आणि रोख रक्कमेचा साठा

तपासादरम्यान विविध शहरांमध्ये भूखंड, शेतीजमीन, निवासी फ्लॅट, आलिशान घरे तसेच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू सापडल्याची माहिती समोर आली. अधिकाऱ्याच्या नावावर आणि इतर व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा तपशील गोळा केला जात आहे. काही मालमत्तांची बाजारातील किंमत अधिकृत नोंदींमधील किंमतीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचेही तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोजणीपेक्षा पडताळणीच मोठे आव्हान

छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांचे आणि आर्थिक व्यवहारांचे प्रमाण इतके मोठे होते की त्याची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथके नेमावी लागली. संपत्तीची अचूक किंमत, गुंतवणुकीचे स्रोत आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी तपास सुरू आहे. काही मालमत्तांचा बाजारभाव धरल्यास एकूण संपत्ती २०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भ्रष्टाचाराविरोधातील मोठी कारवाई

या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणांमधील कथित भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एसीबीने संबंधित अधिकाऱ्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. संपत्ती कशी मिळवली, त्यामागे कोणाचे सहकार्य होते का आणि आर्थिक व्यवहारांचे जाळे किती मोठे आहे, याचा शोध घेतला जात आहे. या कारवाईकडे तेलंगणातील अलीकडील सर्वात मोठ्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *