ओमानच्या किनाऱ्याजवळ बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तीन भारतीयांचा मृत्यू; आणखी एका जहाजावर हल्ला

जागतिक राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाला कलाटणी देणाऱ्या मध्यपूर्वेतील युद्धाला आता आणखी गंभीर वळण मिळालं असून, ही ठिणगी दिवसागणिक भीषण वणव्यात रुपांतरित होताना दिसत आहे. भारतापर्यंत युद्धाच्या या झळा आता अधिक तीव्रतेनं पोहोचत आहेत. कारण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावानं काही भारतीयांचाही बळी घेतला आहे.

‘एमटी सेटेबेलो’ नावाच्या जहाजावर झालेल्या दुर्घटनेमध्ये ओमानच्या किनाऱ्यानजीक तीन भारतीय बेपत्ता असल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली होती, ज्यानंतर आता या नाविकांच्या मृत्यूचं अधिकृत वृत्त समोर आलं आहे. पलाऊचा ध्वज असणाऱ्या या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर व्यापक स्तरावर शोधमोहिम राबवण्यात आली होती. सुरुवातीच्या बचावकार्यादरम्यान या दुर्घनेतील 2 भारतीयांचे मृतदेह ताब्यात घेतले गेले होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या संपूर्ण घटनेची निंदा करत हे भारतासाठी मोठं नुकसान असल्याचं म्हणत मृतांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं.

आणखी एका जहाजावर हल्ला… 

ओमानच्या किनाऱ्यानजीक झालेल्या भीषण जहाज हल्ल्याला 24 तास उलटत नाहीत, तोच आणखी एका हल्ल्याचं वृत्त समोर आलं. हा हल्ला ओमानच्या शिनास बंदरापाशी झाला. एमटी जलवीर नावाच्या जहाजावर झालेल्या या हल्ल्याचे काही फोटोसुद्धा समोर आले, ज्यामध्ये जहाजाच्या एका भागातून प्रचंड धूर येत असल्याचं पाहायला मिळालं.

सदर घटनेबबात जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार, 11 जून 2026 ला शिनास बंदरापाशी एका जहाजाला या हल्ल्याबाबतची माहिती मिळाली. घटनेचं गांभीर्य पाहता यावर केंद्रीय यंत्रणासुद्धा लक्ष ठेवून त्याबाबतची अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नांत आहेत. ओमानमधील भारतीय दूतावासानंही या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

पंतप्रधानही घटनेवर लक्ष ठेवून… 

ओमानमध्ये भारतीय जहाजांवर होणाऱ्या या हल्ल्यांवर खुद्द पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहेत. आधीच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबाला पूर्ण मदत करण्यातं आश्वासन देत या कठीण प्रसंगी भारत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं म्हणत धीर दिला. इतकंच नव्हे तर हल्ल्यातून बचावलेल्या इतर नाविक पथकाला सुरक्षितरित्या मायदेशी परत आणण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी केंद्रीय मंत्रालय आणि सरकारच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी याबाबतची जबाबदारी सोपवली असून, मृतांचं पार्थिवही भारतात आणण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याच्या सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *