जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वाटूर ते मांठा या दिंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. करोडो रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब तडे गेल्याचं चित्र समोर आलं असून, त्यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिक आणि वाहनधारकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर वारीसाठी धार्मिक महामार्ग
वाटूर ते मांठा दिंडी महामार्गाचं काम काही वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी तसेच पंढरपूर वारीसाठी धार्मिक महामार्ग आहे तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र, रस्त्याचं काम पूर्ण होऊन फारसा कालावधी लोटलेला नसतानाही रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी या भेगा इतक्या रुंद झाल्या आहेत की, दुचाकी वाहनांचं संतुलन बिघडून दर तीन-चार दिवसाला छोटे-मोठे अपघात होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता प्रत्यक्षात रस्त्यावर तडे गेल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत. विशेषत दुचाकीस्वार आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या भेगांमुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात या भेगांमध्ये पाणी साचल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
