पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा १२ स्थानकांचा पहिला टप्पा होणार सुरू, डेडलाइन जाहीर!

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा १२ स्थानकांचा पहिला टप्पा येत्या ३० जूनपर्यंत सुरू करा, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात शहरवासीयांना हिंजवडी ते मेट्रोचा अर्धा प्रवास करता येणार आहे, तर शिवाजीनगरपर्यंत प्रवास करण्यासाठी आणखी अडीच ते तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला विलंब होत असून, येत्या ३० जूनपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी ‘पीएमआरडीए’ला दिल्या.

दरम्यान, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३० जूनपर्यंत सुरू करण्याची सूचना दिली आहे. या मार्गावर काही कामे अपूर्ण असल्याने येत्या १५ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके सुरू करणार आहोत. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांत शिवाजीनगरपर्यंतची २३ स्थानके सुरू करणार आहोत,” असं पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी म्हटलं आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प दृष्टिक्षेपात
स्वरूप : सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरील देशातील पहिलीमेट्रो
स्थानकेः २३
मार्गिका : हिंजवडी ते शिवाजीनगर (२३.२ किमी, उन्नत मार्ग)
भागीदार : टाटा समूहाची ‘टीआरआयएल’ आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स
एकूण खर्चः ८,३१३ कोटी रुपये

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पायाभूत सुविधा गतीने पूर्ण करा

‘संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला. विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम संबंधित यंत्रणेने देऊ नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

दरम्यान, ‘प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर करण्याचे काम संबंधित यंत्रणांनी करावे; तसेच कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे,’ असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस प्रकल्पांचा आढावा घेताना बैठकीत बोलत होते. कुठल्याही परिस्थितीत पायाभूत सुविधांचे प्रकल्प तीन ते साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण झाले पाहिजेत, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *