केरळात मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, विदर्भात मान्सून पूर्व पाऊस कोसळणार

मान्सूनचे अखेर केरळमध्ये आगमन झाले आहे. यंदा तो नेहमीपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल बनत असून येत्या काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. विदर्भात 15 जूननंतरच मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “विदर्भात साधारणपणे १० ते १५ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होत असते. यापूर्वीच्या वर्षांमध्येही याच कालावधीत मान्सून दाखल झाल्याचे दिसून आले आहे. काही वेळा तो लवकर तर काही वेळा उशिरानेही पोहोचतो. सध्या मात्र विदर्भासाठी मान्सूनच्या आगमनास आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती तयार झालेली नसल्याने त्याच्या आगमनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही”, असं शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितलं.

राज्यातील तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

दरम्यान, “पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव दिसून येणार आहे. हवामान विभागाने वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे”, अशी माहिती प्रवीण कुमार यांनी दिली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना मोलाचं आवाहन

विदर्भात सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नाही. पुढील काही दिवस विदर्भात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मात्र १० जूननंतर तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असल्याने केवळ या पावसाच्या आधारावर पेरणीची घाई करू नये. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच खरीप हंगामातील पेरणी सुरू करावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *