शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न, ठाण्यात राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्र राज्य विधान परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघातून महायुतीच्या वतीने रिंगणात असलेले शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी चर्चेत होती. त्यामुळे ‘डॅमेज कंट्रोल’ म्हणून शिवसेनेकडून या भेटीगाठींच्या सत्रांना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे रवींद्र फाटक तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे महापालिकेचे गटनेते अभिजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे माजी खासदार कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी आणि माधवी नाईक उपस्थित होते.

मात्र भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक या भाजपच्या नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. त्यात महायुतीमधील धुसफूस आमच्या कामी येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘मविआ’ उमेदवार अभिजित पवार यांचा अर्ज दाखल करताना व्यक्त केला होता. आव्हाड यांच्या सूचक वक्तव्याने महायुतीतील नाराजी अधोरेखित होत असतानाच मंगळवारी रात्री फाटक यांनी भाजपच्या केळकर यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी भाजपचे नगरसेवक अमित सरैय्या उपस्थित होते.

विविध विषयांवर चर्चा

या भेटीला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. जनहिताच्या कामांना अधिक गती देण्यासाठी आणि विकासाचा प्रवास अधिक सक्षम करण्याबरोबर भविष्यातील उपक्रमांबाबत सकारात्मक संवाद या प्रसंगी साधल्याचे फाटक यांनी सांगितले. मी अर्ज दाखल केला. तेव्हा भाजप आमदार निरंजन डावखरे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. या पार्श्वभूमीवर आमची चर्चा झाली असून महायुतीत कोणताही बेबनाव नसल्याचे फाटक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी होताना बघायला मिळाली. ही बंडखोरी रोखणं वरिष्ठांपुढे मोठं आव्हान होतं. पण नाशिक वगळता इतर ठिकाणचे बंड शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना बऱ्यापैकी यश आलं आहे. दुसरीकडे ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. असं असलं तरी इथे भाजप आणि शिवसेना यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचं लपून राहिलेलं नाही. वनमंत्री गणेश नाईक यांनी इथे जनता दरबार घेण्यापासून ते शिंदेंवर टीका करणं, अशा घटना सातत्याने घडत आलेल्या आहेत. यामुळे ठाण्याच्या विधान परिषदेच्या जागेकडे राज्याचं लक्ष लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *