पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका लॉजिंगवरील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस आणि दहशतवाद विरोधी शाखेने (एटीएस) संयुक्तपणे टाकलेल्या या धडक छाप्यात सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. यातील तीन महिला बांगलादेशी आहेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याचा साथीदार फरार झाला आहे.
लुतफ्फर मुज्जमलहक शेख (वय ४५, मूळ रा. हुगळी, पश्चिम बंगाल, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार बबलू साहू (सध्या रा. कारेगाव, मूळ रा. ओडिशा) फरारी आहे.
कारेगाव हद्दीतील नगर-पुणे महामार्गाला लागून असलेल्या लॉजिंगमध्ये परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) भूषण माने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी पोलिस आणि दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी सात पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली असून, त्यांची रवानगी मुंढवा (पुणे) येथील महिला सुधारगृहात केली आहे.
या छाप्यात फरारी झालेला आरोपी बबलू साहू हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीदेखील अशाच प्रकारे वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्चात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात पुढील तपास करीत आहेत.
