गोरसचे दूध उत्पादक अडचणीत; FDAच्या कारवाईनंतर संकलन व विक्री बंद, तोडगा काढण्यासाठी प्रयत्न

अन्न व औषध प्रशासनाने असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवत गोरस भंडार या संस्थेच्या उत्पादन आणि विक्रीला पुढील आदेशापर्यत सील केले आहे. या कारवाईत २५ लाखांचा उत्पादन साठा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर दूध संकलन व विक्री बंद आहे. त्यामुळे गोपालक, दूध वितरक आणि कर्मचारी अडचणीत आले आहे.

वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था , गोरस भंडार ही दूध संकलन व वितरण करणारी एक सहकारी तत्त्वावरील गांधींवादी संस्था आहे. शहरातील मगनवाडी परिसरात १९३१ पासून ही संस्था कार्यरत आहे. १० ऑक्टोबर १९६१ मध्ये गो संवर्धन गोरस भंडार या संस्थेची नोंदणी झाली. हजारो शेतकरी आणि गोपालक या संस्थेशी जोडले गेले. गोपालकांसाठी ही संस्था उपजीविकेचे साधन बनली. ज्यांची उपजीविका या गोरस भंडारच्या कामकाजावर अवलंबून आहे त्यांना ही संस्था आधार देत आली आहे.

आजघडीला ८५ गोपालक विविध गावांतून गोरस भंडारमध्ये दूध पुरवितात. तर २५० वितरक हे घरोघरी दूध वितरणाचे काम करतात. ज्यामुळे वर्धा शहरात अनेक घरात दूध पोहचण्यास मदत होत आहे. गोरस भंडार आणि त्यांच्या विविध ८ केंद्रात शेकडो कर्मचारी काम करीत आहे. या संस्थेचा गोरस पाक हा पदार्थ प्रसिद्ध आहे. एफडीएच्या कारवाईने थेट त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. दूध विकायचे कुठे आणि घरी ठेवायचे कसे? असा पेच आहे. तर काही गोपालकांनी येथे आणलेले दूध संतापून रस्त्यावर फेकले आहे. काही गोपालकांनी पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *