बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी

मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. आता ती बॉडी आढळलेल्या तरुणीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी पत्रक जारी केले आहे. मृत तरुणीबद्दल माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केले आहे.

पुरलेलं शव बाहेर काढण्याची वेळ

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडके कापून हत्या केलेल्या तरुणीचा पोलिसांनी दफनविधी केला होता. आता पोलिसांवर पुन्हा नव्याने तपास करण्यासाठी पुरलेलं शव बाहेर काढण्याची वेळ आली. बॉडी बाहेर काढल्यानंतर न्यायवैद्यक पथकाने तपासणी केल्याचे समजते. या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील यांनी जातीने लक्ष घातले असून बुधवारी ते तीन ते चार तास जळगाव जामोद पोलिस ठाण्यात होते.

तरुणीच्या शवाची ओळख पटविणे आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील यांनी तपास यंत्रणेला मार्गदर्शन केल्याची माहिती आहे. पाटील हे घटनास्थळी गेले होते. तेथे बारकाईने त्यांनी निरीक्षक केल्याचे सूत्रांकडून समजते. पोलिसांचा चुकीच्या दिशेने भरकटलेला तपास आणि निरपराध लोकांना हत्येमध्ये गोवण्याचा झालेला प्रयत्न यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

हत्येचं गूढ

मध्य प्रदेशातील खडकी येथील शिवानी कलमेकर हिचे ते शव होते आणि वडील-भावानेच तिची हत्या केली, या निष्कर्षावर पोहोचून पोलिसांनी हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव जामोद पोलिस मोकळे झाले होते. परंतु शिवानी जिवंत पोलिसांसमोर उभी ठाकल्याने या हत्येमागील गूढ वाढले. हत्याकांडाला वेगळीच कलाटणी मिळाली आणि पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले.

पोलिस महानिरीक्षकांच्या भेटी दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपास अधिकारी संतोष खाडे, तहसीलदार पवन पाटील, मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन, वाशीम स्थानिक गुन्हे शाखा पथक, विशेष शोध मोहीम पथक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *