धर्मांतरास नकार दिल्याने महिला कर्मचारी बडतर्फ; हिंजवडीतील बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रकार

हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतरास नकार दिल्याने एका हिंदू महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

कंपनीत कार्यरत असताना धर्मांतरण करण्यासाठी आणि अन्य धर्मीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी माझ्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. या विरोधात मी कंपनीकडे तक्रार केली. मात्र, कंपनीने संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी मलाच नोकरीवरून काढले, असा दावा पीडित महिलेने बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, पराग गोखले, ॲड. विवेक भोसले, क्रांती पेटकर, गोपाल तेलंग आदी उपस्थित होते. ‘कंपनीतील वरिष्ठांनी माझ्यावर दबाव आणून बळजबरीने राजीनामा लिहून घेतला. कंपनीतील या छळाविरोधात वकिलामार्फत कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पुण्यातील आयटी क्षेत्रात हिंदूंविरोधी अजेंडा राबवला जात आहे. ‘कॉर्पोरेट जिहाद’चा प्रकार खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तातडीने लक्ष घालून कारवाई करावी,’ अशी मागणी घनवट यांनी केली.

‘हिंजवडीतील एका कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने तिच्या सहकारी महिला कर्मचाऱ्याविरोधात मानसिक छळाचा अर्ज दिला आहे. सहकारी महिलेने काही अयोग्य शब्द वापरल्याचा आरोप अर्जात असून, या अनुषंगाने संबंधित महिला कर्मचाऱ्यास; तसेच कंपनीतील वरिष्ठांना चौकशीसाठी बोलावले आहे. चौकशी सुरू आहे,’ असे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले.

कामठीत महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न
जिवे मारण्याची धमकी देत कोलकात्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी जुनी कामठीतील गाडेघाट येथील हुजूर मरियम अम्मा दर्ग्याच्या बाबासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोलकत्यातील डमडम पोलिसांनी दाखल केलेले प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पीडित महिला कोलकात्यातील डमडम भागात राहते. ती दर्शनासाठी नेहमी जुनी कामठीतील दर्ग्यावर येते. नेहमीप्रमाणे एप्रिल महिन्यात ती मरियम अम्मा दर्गा येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. १८ एप्रिल रोजी रात्री काही जणांनी तिचे बळजबरीने धर्मांंतर करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर महिलेचा विनयभंग करुन तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तिला डांबून ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *