ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो ठरणार डोकेदुखी? तज्ज्ञांचा आक्षेप, नागरिक आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे धाव

 ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी शहरांतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात असून सुमारे १२ हजार २०० कोटी रुपयांच्या खर्चातून उभा राहणाऱ्या या प्रकल्पास नियोजन तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. प्रकल्पाच्या सविस्तर अहवालातील मूलभूत त्रुटी, प्रवासी संख्येचे अवास्तव अंदाज, विद्यमान मेट्रो मार्गांशी होणारी पुनरावृत्ती, पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष आणि नागरिकांना विश्वासात न घेता होणाऱ्या कामांना तात्काळ स्थगिती देण्यासाठी सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट या संस्थेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प वादात सापडला आहे.

ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे शहरात रिंग रेल्वे मेट्रोच्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. हा मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा असून २६ कि.मी. जमिनीवरून तर ३ कि.मी. जमिनी खालून जाणार आहे. महामेट्रो प्राधिकरणाकडून ठाणे शहरात या प्रकल्पाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाबद्दल सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे संस्थेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नगररचनाकार सुलक्षणा महाजन, पर्यावरणतज्ज्ञ नागेश टेकाळे आणि पर्यावरण कायदेतज्ज्ञ हेमा रमणी शनिवारी ठाण्यात या सविस्तर प्रकल्प अहवालातील तृटींवर आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाणे अंतर्गत मेट्रो मार्ग मेट्रो चार आणि मेट्रो पाच या प्रकल्पाच्या तीन स्थानकांशी समांतर असून येथे पायाभूत सुविधांची पुनरावृत्ती होऊन यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. एमएमआरडीए आणि महामेट्रो प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे या स्थानकांमधील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सुलक्षणा महाजन यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी टीएमटीचा विस्तार, सायकल ट्रॅक, पदपथांचा विस्तार, उपनगरीय रेल्वेचे एकत्रिकरण आणि पार्किंग व्यवस्थापन करून वाहतुक सुरळीत करण्याची आवश्यकता असल्याचे कायदेतज्ज्ञ हेमा रमणी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *