दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदरम्यान मेट्रो ९ मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी एमएमआरडीएने सात नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मिरा-भाईंदर रोडवरील वाहतूक लक्षात घेता पादचाऱ्यांसाठी हे पूल महत्त्वाचे ठरणार आहेत. राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सुमारे ११ किमी लांबीच्या मेट्रो ९ वरील आठ स्थानकांवरील पूल एमएमआरडीएच्या ‘मल्टि-मोडल इंटिग्रेशन’ (एमएमआय) उपक्रमाचा भाग आहेत. मेट्रो २अ आणि ७ मार्गांवर राबविण्यात आलेल्या एमएमआय उपक्रमाच्या धर्तीवर हे पूल विकसित केले जाणार आहेत. या कामासाठी ८२.०९ कोटी रु. खर्च अपेक्षित आहे.
कोणत्या सुविधा उपलब्ध होणार?
सर्व पुलांची रुंदी तीन मीटर असेल. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी पुलाला सरकते जिने, लिफ्ट अशा सुविधा असणारआहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पुलांमुळे रस्ते सुरक्षितपणे ओलांडणे शक्य होईल, तसेच गर्दीच्या वेळी प्रवाशांचे व्यवस्थापन सुलभ होण्यास मदत होणार आहे. मेट्रो ९ मार्गावरील पहिला टप्पा ७ एप्रिलला सुरू झाला आहे. उर्वरित अंतिम टप्प्यातील कामे सध्या सुरू आहेत. पूर्ण मार्ग सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना आवश्यक पादचारी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. या कामासाठी ‘स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर जेव्ही’ आणि ‘पीआरएस इन्फ्राप्रोजेक्ट्स एलएलपी’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी समुारे 50 किलोमीटर लांब मेट्रो मार्गांमध्ये भर पडत आहे. त्यामुळे मेट्रोवरील प्रवास सोपा करण्यासाठी इतर पायाभूत सुविधा विकसित करणंही महत्त्वाचं आहे.
‘आधुनिक शहरी वाहतूक व्यवस्थेत ‘मल्टि-मोडल इंटिग्रेशन’ हा महत्त्वाचा घटक आहे. प्रस्तावित नवे पादचारी पूल नागरिकांच्या सुरक्षित हालचाली आणि स्थानकांपर्यंत पोहोचणे सुलभ करणार आहेत. प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल’, असे एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
कुठे-कुठे बांधणार पूल?
- पश्चिम द्रुतगती महामार्ग
- दहिसर टोलनाका – १४५ मीटर
- मिरागाव ८७ मीटर
- मिरा-भाईंदर रोड
- काशीगाव ९२ मीटर
- शिवार गार्डन ८० मीटर
- मॅक्सस मॉल ८३ मीटर
- वेज सागर हॉटेल ८८ मीटर
- साईबाबानगर – ८० मीटर
