मेट्रो लाइन 1वर पुण्यातील पहिली भुयारी मार्गिका, खोदकामासाठी ‘शाफ्ट’ बांधणार; पुणे-सातारा मार्गावर काम सुरू

मेट्रो लाइन 1च्या विस्तारिकरणाचं काम सुरू झालं आहे. पुणे-सातारा मार्गावर स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचं काम सुरू झालं आहे. भुयारी मेट्रो मार्गासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले शाफ्ट तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. या शाफ्टद्वारे खाली उतरून भुयारचं खोदकाम आणि स्थानकांचं बांधकाम करणं शक्य होतं. मार्केट यार्ड आणि बिब्वेवाडी स्थानकं उभारण्यात येणार असलेल्या परिसरात सध्या बांधकाम सुरू झालं आहे.

कसं होणार खोदकाम?

या शाफ्टमधून ‘टनेल बोरिंग मशीन’ (TBM) खाली उतरवण्यात येणार आहे. या मशीनच्या मदतीने खोदकाम होईल. या खोदकामादरम्यान भुयारावरील मार्गवार कमीत-कमी ताण पडावा यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर केला जात असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या मार्गांखाली या मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे अनेक अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी टप्प्या-टप्प्यानं खोदकाम करण्याचा निर्णय मेट्रोनं घेतला आहे.

लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळ एका शाफ्टचं खोदकाम सुरू झालं आहे. या शाफ्टमधून एका टीबीएमनं भुयार तयार करण्यात येईल. पण टीबीएमचं काम सुरू होण्यासाठी सप्टेंबर उजाडणार असल्याची माहिती महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली असल्याचं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. कात्रज आणि स्वारगेट या दोन्ही स्थानकांच्या दिशेने एकाच वेळी खोदकाम सुरू होणार आहे.

कुठे असतील स्थानकं?

मेट्रो लाइन 1चा विस्तार करून ही लाइन 1बी तयार होत आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो लाइन 1 गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यानंतर मेट्रोचा विस्तार स्वारगेटमार्गे कात्रजपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मार्गावरील जागेच्या अभावी ही मार्गिका भुयारी असेल असं ठरलं. पुण्यातील ही पहिलीच भुयारी मेट्रो मार्गिका असेल. स्वारगेट ते कात्रज कॉरिडोरवर 5.46 किलोमीटर विस्ताराचं काम सध्या सुरू झालं आहे. या मार्गावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज अशी पाच स्थानकं असतील. ही मार्गिका डिसेंबर 2029पर्यंत प्रवासासाठी खुली करण्याचं महा मेट्रोचं उद्देश्य आहे.

या स्थानकाच्या बांधकामासाठी यापूर्व वाहतूक बदल लागू करण्यात आले होते. पण वाहतूक पोलिसांच्या निर्देशांनंतर हे बदल मागे घेऊन वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. कात्रज चौकात महापालिकेकडून सुरू असलेलं कलव्हर्टचं काम पूर्ण झाल्यानंतर हे बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 दिवसांत हे काम पूर्ण करून पुन्हा वाहतूक वळवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *