हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी निविदा मागवल्या आहेत. एमयूटीपी ३ए अंतर्गत हार्बर विस्तार प्रकल्प राबवण्यात येत आहे.
बोरीवलीच्या प्रवाशांना दिलासा
गोरेगाव–बोरिवली हार्बर मार्ग विस्तारामुळे पश्चिम उपनगरांतील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या हार्बर मार्ग गोरेगावपर्यंत मर्यादित असल्याने बोरिवली, मालाड आणि कांदिवली परिसरातील प्रवाशांना त्याचा लाभ मिळत नाही. बोरिवलीपर्यंतचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. बोरिवली परिसरातून सीएसएमटी, कुर्ला, पनवेल आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट लोकल मिळणार आहे. जोगेश्वरी, राम मंदिर, गोरेगाव येथील प्रवाशांना मात्र गर्दीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी)-३ए अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गोरेगाव–बोरिवली हार्बर मार्ग विस्तार प्रकल्पाची एकूण किंमत ८९८.२९ कोटी रुपये आहे. सद्यस्थितीत नागरी अभियांत्रिकी कामांसाठी ७२७.६४ कोटी, विद्युत कामांसाठी ८८.३३ कोटी तर सिग्नलिंग व दूरसंचार कामांसाठी ८२.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
पुलांच्या आराखड्यांची तयारी सुरू
या मार्गावर दोन मोठे आणि १६ लहान पूल उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी चार अभियांत्रिकी आराखडे तयार करण्यात आले असून ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. बहुतांश पुलांना आवश्यक मंजुरी मिळाली असून उर्वरित पुलांच्या आराखड्यांची तयारी सुरू आहे.
पुनर्वसनासाठी घरे
प्रकल्पासाठी एकूण ३,६८७.७ चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी तीन हजार ३८९ चौ. मीटर खासगी जमीन असून २९८.७ चौ. मीटर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यातील आहे. रेल्वेच्या जागेवरील ५२० प्रकल्पग्रस्तांची निश्चिती झाली असून १७८ जणांना पुनर्वसनासाठी घरे देण्यात आली आहेत.
प्रकल्पातील ५६.८४ कोटी रुपयांच्या स्थानक व सेवा इमारतींच्या बांधकामाचे कंत्राट नियुक्त करून काम सुरू आहे. ६९.९८ कोटी रुपयांच्या पादचारी पूल, डेक आणि स्कायवॉक उभारणीचे कामेही विविध टप्प्यांत आहेत.
