HSRP साठी रजिस्टर केलं, पण नंबरप्लेट आली नाही, पुण्यात लाखो वाहन चालक ताटकळत, मुदत उलटल्यास दंड फिक्स

राज्य सरकारकडून एकीकडे सुरक्षा नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनांवर कारवाईचा इशारा दिला जात आहे; पण दुसरीकडे सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी करूनही बराच काळ वाहन चालकांना ताटकळत थांबावे लागत आहे. नोंदणी केलेल्या दोन लाख वाहनांना अद्याप कंपनीकडून सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, काही वाहनचालकांकडून नोंदणी केल्यानंतर वेळेत बसवण्यासाठी न जाण्यामुळे हा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे.

एका महिन्यात 15 लाख HSRP चे आव्हान

उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) जून अखेरपर्यंत न बसवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही पुण्यात उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी उदासीनता दिसत आहे. पुण्यात आतापर्यंत नऊ लाख ३५ हजार वाहनचालकांनी ‘एचएसआरपी’ बसवली आहे. त्यामुळे पुण्यात एका महिन्यात १५ लाख वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवणे अशक्य आहे. सुरक्षा नंबरप्लेट न बसवल्यास कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

9 लाख वाहनांना HSRP बसवली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सन २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले. जानेवारी २०२५ पासून ‘एचएसआरपी’ बसविण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार होती. त्यापैकी आतापर्यंत ११ लाख ३६ हजार वाहनचालकांनी सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी नऊ लाख ३५ हजार वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यात आली आहे.

सहाव्यांदा मुदतवाढ, एक हजारांचा दंड

कारवाईचा इशारा दिल्यानंतरही वाहनचालकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. परिवहन विभागाने आतापर्यंत सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर आणि काही दिवसांपूर्वी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही सुरक्षा नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनाला एक हजार रुपये दंड केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. दंडात्मक कारवाई करण्याचे जाहीर केल्यानंतर फक्त दहा हजार वाहनचालकांनी ‘एचएसआरपी’साठी नोंदणी केली आहे, तर सात हजार वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *